चेन्नईतील फातिमाच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे

पीटीआय
रविवार, 15 डिसेंबर 2019

- फातिमा लतिफच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी तामिळनाडू सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा घेतला निर्णय.

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मद्रास येथील विद्यार्थिनी फातिमा लतिफच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी तामिळनाडू सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करावे, असा आग्रह फतिमा यांच्या कुटुंबीयांनी केल्याने राज्याने हे प्रकरण सीबीआयकडे पाठविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

केरळमधील कोल्लम येथे राहणारी फातिमाने यावर्षी जुलैमध्ये आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेतला होता. 9 नोव्हेंबरला तिचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर प्रशासनाने फातिमाला कमी गुण मिळाल्यामुळे ती नैराश्‍यात होती, असे सांगितले होते. तसेच पोलिसांनीही फातिमाने परीक्षांमध्ये अपेक्षित कामगिरी न करता आल्याने आलेल्या नैराश्‍यामुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, फातिमाच्या बहिणीने या प्रकरणी प्राध्यापकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. यानंतर मुलीच्या पालकांनीही या प्रकरणी आयआयटी प्रशासनाला दोष देत त्यंच्या मुलीच्या आत्महत्येला प्राध्यापकांनी केलेला धार्मिक भेदभाव जबाबदार असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. 

Video : घोटाळे असतील तर कामे थांबवायची नाही का? : मुख्यमंत्री

दरम्यान, 10 नोव्हेंबरला फातिमाच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर फातिमाचे कुटुंबिय चेन्नईला पोहोचले. येथे त्यांना फातिमाचा मोबाईल सापडला.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

फातिमाची बहिण आयशाच्या म्हणण्यानुसार, कोणीतरी तिच्या मोबाईलशी छेडछाड करत फोनचा पासवर्ड बदलला होता. फातिमाने मोबाईलच्या होमस्क्रीनवर आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यात तिने सामाजिक विज्ञान विभागातील प्राध्यापकांना तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. कुटुंबाने केलेल्या आरोपानंतर 14 नोव्हेंबरला फातिमाचा मोबाईल तपासासाठी सायबर सेलकडे पाठविण्यात आला आहे. 

कविता सत्तेची गुलाम नसते : डॉ. कुमार विश्वास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI now Handle the Fathima Latheef Death Case