विदेशातील गुन्ह्यांसाठी भारतात शिक्षेची तरतूद

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

प्रत्यार्पण करारामधील मर्यादांमुळे अनेकदा विदेशात गुन्हे केलेले गुन्हेगार परत येतात आणि भारतात सामान्य आयुष्य जगत असलेले दिसून येतात. ही बाब अनेक प्रकरणांमध्ये समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आवश्‍यक ते अधिकार सीबीआयला देण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले

नवी दिल्ली - विदेशात गुन्हे करून भारतात छुप्या मार्गाने प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकांवरही गुन्हे दाखल करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्ती आता कायद्यानेच केंद्रीय अन्वेशन विभागाला (सीबीआय) देण्यात आली आहे.

विदेशात गुन्हे करून मायदेशी परतलेल्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून भारतीय कायद्यानुसार त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार सीबीआयला देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांची चौकशी करून त्यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार सीबीआयला देण्यात आला आहे. त्यामुळे विदेशात गुन्हे करून भारतात पळून आलेल्यांना शिक्षा ठोठविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

प्रत्यार्पण करारामधील मर्यादांमुळे अनेकदा विदेशात गुन्हे केलेले गुन्हेगार परत येतात आणि भारतात सामान्य आयुष्य जगत असलेले दिसून येतात. ही बाब अनेक प्रकरणांमध्ये समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आवश्‍यक ते अधिकार सीबीआयला देण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.

जगभरातील एकूण 39 देशांबरोबर भारताचे गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाबाबत करार करण्यात आले आहेत. त्या पैकी 21 देश ज्या देशांत गुन्हा घडला आहे त्या देशाकडे आपल्या नागरिकांचे प्रत्यार्पण करत नाहीत. परिमाणी भारत आपल्या नागरिकांचे बुल्गेरिया, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरेबिया, पोलंड, पोर्तुगाल, व्हिएतनाम आदी देशांना प्रत्यार्पण करत नाही. त्यामुळे वरील देशांमध्ये गुन्हे करून अनेक भारतीय नागरिक भारतात आश्रय घेतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी अशी वरील देशांची मागणी होती.

Web Title: CBI to Prosecute Indian Fugitives Wanted by Foreign Governments