CBSE Result : 'सीबीएसई'चा बारावीचा निकाल 83 टक्के

CBSE Result : 'सीबीएसई'चा बारावीचा निकाल 83 टक्के

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल गुरुवारी लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 83.4 टक्के आहे. मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा आणि गाझियाबादची हंसिका शुक्‍ला या दोघी 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या, अशी माहिती "सीबीएसई'च्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व विभागांचे निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात आले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी 88. 70; तर मुलांची 79.40 टक्के आहे. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनीही परीक्षेत चांगली कामगिरी केली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 83.3 टक्के आहे. या वेळी मुलींनी बाजी मारली असून, मुलांपेक्षा त्यांचे उत्तीर्णाचे प्रमाण नऊ टक्‍क्‍यांनी जास्त आहे. मंडळाच्या तिरुअनंतपुरम विभागात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे 98.20 टक्के आहे. त्याखालोखाल चेन्नई (92. 93 टक्के) आणि दिल्ली (91.87 टक्के) यांचा क्रमांक आहे.

"सीबीएसई'ची बारावीची परीक्षा 16 फेब्रुवारीला सुरू झाली होती. देशभरातून 12.05 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 0.39 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

केजरीवाल यांच्या मुलाचे यश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित केजरीवाल यानेही यंदा "सीबीएसई'ची 12वी परीक्षा दिली होती. त्याला 96.4 टक्के गुण मिळाले आहेत. पुलकित हा नोएडातील खासगी शाळेत शिकत होता.

पुलकितच्या यशाची माहिती केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ट्‌विटरवरून दिली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुलकितचे अभिनंदन केले आहे. अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिनेही 2014 मध्ये बारावीला 96 टक्के गुण मिळविले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com