'सीबीएसई'ची दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा होणार?

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

या विषयावर अद्याप एकमत झाले नसले, तरीही हा निर्णय लगेच लागू करण्याची घाई केली जाणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 2018 पासून 'सीबीएसई'च्या दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा सुरू केली जाऊ शकते.

नवी दिल्ली: शिक्षणाचा दर्जा खालावल्याची चर्चा देशभरात सुरू असताना यावरील एक तोडगा म्हणून 'सीबीएसई'च्या शाळांमध्ये दहावीची बोर्डाची परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या 25 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

सहा वर्षांपूर्वी 'सीबीएसई'ची दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'बोर्डाची परीक्षा रद्द केल्याने आणि नापास न करण्याच्या धोरणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, अशी चिंता विविध शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांच्या संघटनांनीही व्यक्त केली होती. तसेच, ही परीक्षा रद्द केल्याने नंतर बारावीच्या परीक्षेच्या दडपणाला सामोरे जाण्यातही अनेक विद्यार्थ्यांना अडचण येते. हा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने निर्णायक टप्पा असतो. अर्थात, दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा लागू करण्याविषयी अद्याप एकमत झालेले नाही.'

यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑक्‍टोबर रोजी केंद्रीय शिक्षण समितीची बैठक होणार आहे. या विषयावर अद्याप एकमत झाले नसले, तरीही हा निर्णय लगेच लागू करण्याची घाई केली जाणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 2018 पासून 'सीबीएसई'च्या दहावी बोर्डाची परीक्षा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. 2010 मध्ये 'सीबीएसई'ने ही परीक्षा रद्द करून त्याऐवजी वर्षभर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याची पद्धत अंमलात आणली होती.

'सीबीएसई'ने हा निर्णय घेतल्यास राज्य शिक्षण मंडळांनाही सहावी ते आठवीमध्ये विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणाविषयी पुनर्विचार करणे शक्‍य होऊ शकेल.

Web Title: CBSE likely to re-introduce Class X Board exam from 2018