'सीबीएसई'च्या दहावीची फेरपरीक्षा रद्द

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नवी दिल्ली : पेपरफुटीच्या प्रकरणानंतर इयत्ता दहावीची गणिताची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय 'सीबीएसई'ने घेतला आहे. यासंदर्भात 'टाईम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिले आहे. 

नवी दिल्ली : पेपरफुटीच्या प्रकरणानंतर इयत्ता दहावीची गणिताची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय 'सीबीएसई'ने घेतला आहे. यासंदर्भात 'टाईम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिले आहे. 

दिल्ली आणि हरियाना या राज्यांमध्ये 'सीबीएसई'ची फेरपरीक्षा घेतली जाण्याची शक्‍यता होती. या दोन राज्यांमध्ये गणिताचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या सुरवातीस 'सीबीएसई'च्या सर्वच विद्यार्थ्यांना गणिताची फेरपरीक्षा द्यावी लागण्याची चिन्हे होती. याविरोधात देशभरात निदर्शने झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'फेरपरीक्षा केवळ दिल्ली आणि हरियानापुरती मर्यादित असेल', असे जाहीर केले होते. 

यानंतर दहावीच्या उत्तरपत्रिकांचे सखोल विश्‍लेषण करण्यात आले. पेपर फुटल्याचा विशेष परिणाम झाला नसल्याचे या अभ्यासातून समोर आले. त्यामुळे दहावीची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आज (मंगळवार) अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिल रोजी होणार आहे. बवाना येथील खासगी शाळेतील दोन शिक्षकांनी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 45 मिनिटे अर्थशास्त्राच्या पेपरचे फोटो काढून व्हॉट्‌सऍपवर इतरांना पाठविले. या दोन शिक्षकांना अटक झाली आहे.

Web Title: CBSE paper leak : No retest for CBSE Class 10 students