गणवेश, पुस्तकांच्या 'धंद्या'ला छडी!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

शिक्षणाचा वाढता पसारा...

  • 23 कोटी : देशातील विद्यार्थी संख्या
  • 1200 : केंद्रीय विद्यालये
  • 3600 : कस्तुरबा गांधी विद्यालये
  • 3 लाख 60 हजार : प्राथमिक शाळा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आपल्या शाळांमध्ये 'NCERT'च्या पुस्तकांऐवजी खासगी प्रकाशकांची क्रमिक पुस्तके, तसेच खासगी ठेकेदारांकडून शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करणे पालकांना सक्तीचे करणाऱ्या शाळांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या सूचनेनुसार 'NCERT'ला देशातील विद्यार्थिसंख्येसाठी पुरेशी क्रमिक पुस्तके उपलब्ध करून देण्यासही सांगितले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात चाललेल्या व्यावसायिक उलाढाली बंद करण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही स्पष्ट केले आहे.

शालेय पुस्तके, शैक्षणिक साहित्य व गणवेश विकण्याबाबत मंत्रालयाने एक सूचनावली जारी केली आहे. तिचे पालन करणे 'CBSE'शी संलग्न साऱ्या शाळांना बंधनकारक राहणार आहे. देशातील विद्यार्थिसंख्या 23 कोटींवर पोचली आहे. यात 1200 केंद्रीय विद्यालये, 3600 कस्तुरबा गांधी विद्यालये, तीन लाख 60 हजार प्राथमिक शाळा, लष्कर, हवाई दल व नौदलाच्या शेकडो शाळा यांच्यासह हजारो खासगी शाळांमध्येही 'CBSE' अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र 'CBSE'शी संलग्न शाळांमध्ये खासगी प्रकाशकांशी महागडी पुस्तके घेणे बंधनकारक केले जाते. यातील 'अर्थपूर्ण' व्यवहाराची एक साखळीच तयार झाली आहे. 'CBSE'चे एक पुस्तक समजा 50 ते 80 रुपयांना असेल तर त्याच विषयाचे खासगी पुस्तक 100-150 रुपये किमतीला सर्रास विकले जाते व शाळा तेच घेण्याची सक्ती करतात. जावडेकर यांच्या मंत्रालयाने असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा शाळांना दिला आहे.

'CBSE'चे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे व हा धंदा बंद करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मंत्रालय देशभरात भरारी पथकेही पाठविण्याचा विचार करत आहे. याची सुरवात दिल्लीतील 'नामवंत' असा शिक्का लागलेल्या खासगी शाळांपासून होईल, असेही संकेत मंत्रालयाच्या सूत्रांनी दिले. 'CBSE' शाळांची व विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या पहाता पुस्तके व शैक्षणिक साहित्यचा पुरवठा करण्याची 'NCERT'ची क्षमता नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर जावडेकर यांनी मागील वर्षी बैठक घेऊन, गरजेइतकी पुस्तके छापण्यासाठी किती काळ लागेल असे विचारले होते. त्या दृष्टीने 'NCERT'ची बऱ्यापैकी सज्जता झाल्याचे लक्षात येताच 'CBSE'ने खासगी व्यावसायिकांचे उखळ पांढरे करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.

'NCERT'चीच पुस्तके घेण्याच्या या दंडकाविरुद्ध खासगी शाळांच्या व्यवस्थापनांनी व खासगी पुस्तक प्रकाशकांच्या लॉबीने सुरू केलेली कुरकुर आता दबावतंत्र वापरण्याइतपत वाढली आहे. खासगी प्रकाशकांची पुस्तके तुलनेने दर्जेदार असतात, त्यामुळे मंत्रालयाच्या 'NCERT' सक्तीमुळे शिक्षणाचा दर्जा घसरेल असाही दावा शाळांकडून होत आहे.

    Web Title: cbse school and books