'सीसीडी' कारवाईबाबत प्राप्तिकर विभागाची भूमिका 

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

कंपनीत "केकेआर'चे समभाग 
सिद्धार्थ हे बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच रोखे बाजारामध्ये "कॉफी डे एंटरप्रायजेस'ला मोठा फटका बसून या कंपनीचे एकाच दिवसात 813 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर "आयपीएल'मधील क्रिकेटचा संघ "कोलकता नाईट रायडर्स'ने "कॅफे कॉफी डे'मध्ये आमचे आता सहा टक्के समभाग असल्याचा दावा केला आहे. 

नवी दिल्ली : "कॅफे कॉफी डे'चे (सीसीडी) प्रवर्तक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्याविरोधात कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्यात आली होती, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले. तत्पूर्वी सिद्धार्थ यांनी त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला कर अधिकाऱ्यांच्या छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला होता. 

प्राप्तिकर विभागाने मात्र हे आरोप सपशेलपणे फेटाळून लावले आहेत. विभागाचे केवळ महसुली हित लक्षात घेऊनच आम्ही कारवाई केली होती, तसेच या उद्योगसमूहावर काही दिवसांपूर्वी छापे घालण्यात आले असता तेव्हा काही ठोस पुरावे आमच्या हाती लागले होते, सिद्धार्थ यांनीच आपल्याकडे काळे धन असल्याची कबुली दिली होती, सध्या सोशल मिडियावर व्हायरल होते असलेले सिद्धार्थ यांचे पत्र आणि कार्यालयीन दस्तावेजांवर त्यांनी केलेली स्वाक्षरी यामध्ये मोठी तफावत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे घालण्यात आले तेव्हा त्यांनीच आपल्याकडे काळे धन असल्याची कबुली दिली होती. असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. "माईंडट्री'च्या समभाग विक्रीतून सिद्धार्थ यांना 3 हजार दोनशे कोटी रुपये मिळाले होते, "मॅट'अंतर्गत त्यांनी तीनशे कोटी रुपये देणे भाग होते, पण त्यांनी केवळ 46 कोटी रुपयांचा भरणा केला होता असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

कंपनीत "केकेआर'चे समभाग 
सिद्धार्थ हे बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच रोखे बाजारामध्ये "कॉफी डे एंटरप्रायजेस'ला मोठा फटका बसून या कंपनीचे एकाच दिवसात 813 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर "आयपीएल'मधील क्रिकेटचा संघ "कोलकता नाईट रायडर्स'ने "कॅफे कॉफी डे'मध्ये आमचे आता सहा टक्के समभाग असल्याचा दावा केला आहे. 

"कोकाकोला'शी व्यवहार? 
सिद्धार्थ यांना कंपनीतील त्यांच्या मालकीचे समभाग कोकाकोला या कंपनीस विकायचे होते आणि यासाठी त्यांची कंपनीसोबत अधिकृत बोलणीदेखील सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. "कॉफी डे' संचालकांच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होणार होती. हे प्रत्यक्षात आले असते तर  "कोकाकोला'ची अन्य उद्योगसमूहातील ही दुसरी मोठी गुंतवणूक ठरली असती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये "कोकाकोला'ने ब्रिटनमधील कोस्टा कॉफी हा ब्रॅंड 5.1 अब्ज डॉलरला विकत घेतला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCD crisis IT officer draws flak for tax terrorism day before retirement