भाताचे पहिले कणीस अर्पण करत महामाया देवीचा उत्सव साजरा

भाताचे पहिले कणीस अर्पण करत महामाया देवीचा उत्सव साजरा

पणजीः डिचोली तालुक्‍यातील मये गावाची ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी भाताचे पहिले कणीस अर्पण करून तीन गावांशी संबंध जोडलेला मये गावचा वैशिष्ट्यपूर्ण नवे उत्सव गुरुवारी (ता.11) पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डिचोलीतील बहुतेक गावोगावी नवे उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र, मये गावात हा उत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

भातशेती पिकून कापणीसाठी तयार झाल्यानंतर परंपरेनुसार हा नवे उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. नवे केल्याशिवाय गावातील शेतकरी भात कापणी करत नाहीत. मयेतील नवे उत्सव मये गावाबरोबरच वायंगिणी येथील श्री खेतोबा देवस्थान व डिचोलीती श्री शांतादुर्गा देवीचे चौगुले (मनकारी) या तीन गावांशी जोडलेला आहे. यादिवशी सकाळी मयेतील चौगुले, वायंगिणी येथील चौगुले आणि गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवीचे ग्रामस्थ गावकर मयेतील श्री देवी महामाया मंदिराच्या प्रांगणात जमतात. नंतर सर्वजण वाजतगाजत मेस्तीची मळी या शेत मळ्याकडे जातात. त्याठिकाणी नव्यासाठी जे भात कापायचे आहे, त्या जागेची निवड करतात. 
त्याठिकाणी चौफेर उभे राहून शेतीत विडा ठेवून विधीवत पूजा केली जाते. नंतर घाडीव्दारे गाऱ्हाणे घातल्यानंतर भाताची कणसे कापण्यात येतात. नंतर चौगुले आणि ग्रामस्थ गावकर ही कणसे माथ्यावर घेवून वाजतगाजत श्री महामाया मंदिराकडे येतात. सर्व कणसे देवीच्या समोर ठेवून त्यांची विधीवत पूजा करण्यात येते. नंतर सर्वजण ही कणसे घेवून जातात. ही कणसे घेऊन प्रत्येकजण आपापल्या घरी येतात आणि भाताची कणसे आपल्या घराच्या प्रवेशव्दारावर बांधतात. भाताच्या दाण्यांची खिचडी करून तो प्रसाद म्हणून खाण्याचीही प्रथा आहे. डिचोली येथील ग्रामस्थ गावकर श्री शांतादुर्गा मंदिरात, तर वायंगिणी येथील चौगुले श्री खेतोबा मंदिरात ही कणसे घेऊन जातात. त्याठिकाणी पूजा केल्यानंतर ग्रामस्थांना ती वाटण्यात येतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com