
Farmer : शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा; खतांसाठी एक लाख कोटींचे अंशदान देण्याचा निर्णय
नवी दिल्ली : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर वाढत्या खतांच्या किमतीचा भार पडू नये यासाठी खतांवर १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे अंशदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या प्रमुख निर्णयाची माहिती देताना मंडाविया म्हणाले, ‘‘ या निर्णयाचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ‘युरिया’, ‘डीएपी’, ‘एनपीए’ या खतांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खतांच्या किमती वाढल्या तरी त्याची झळ देशातील शेतकऱ्यांना बसू नये, या उद्देशाने या खरीप हंगामात एवढ्या प्रमाणावर सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात असलेली एकूण शेत जमीन गृहित धरल्यास केंद्र सरकारने एका हेक्टरसाठी खतावर ८९०९ रुपये सबसिडी दिली आहे.’’