बजेट कोलमडणार : पुन्हा महागाईचा शॉक

स्वयंपाक, व्यावसायिक गॅसचा भडका
central government inflation it sector hiked price cooking gas cylinders share market  currency rate
central government inflation it sector hiked price cooking gas cylinders share market currency rateSakal

नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र सरकारने आज स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा आणखी एक शॉक दिला. अवघ्या बारा दिवसांत दुसऱ्यांदा सिलिंडरच्या दरात साडेतीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरांतही ८ रुपयांनी वाढ झाली आहे. आधीच जीवनावश्यक वस्तू महागल्याने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांवरील आर्थिक भार यामुळे आणखी वाढेल.

देशांतील प्रमुख चारही महानगरांत गॅस सिलिंडरच्या दरांनी एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कोलकत्यात हे दर १ हजार ३० रुपयांच्या जवळपास गेले आहेत. दरम्यान गॅसच्या दरवाढीवर बोलण्याचे टाळणारे भाजप नेते त्याबाबतचा प्रश्न विचारताच पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्पुरती थांबल्याचे सांगतात. उत्तरप्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे रोखून धरलेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा वारू २२ मार्चपासून चौखूर उधळला होता.

६ एप्रिलपर्यंत पेट्रोलचे दर लिटरमागे १० रुपयांपेक्षाही अधिक वाढविण्यात आले त्यानंतर म्हणजे गेला दीड महिना ही दरवाढ झालेली नाही असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. १ मे रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०२.५० रुपयांनी वाढ झाली होती. आज पुन्हा तो ८ रुपयांनी महागल्याने व्यावसायिक वापराचा सिलेंडर २ हजार ३६३ रुपयांना मिळणार आहे.

कामगार मोर्चाची आंदोलनाची हाक

वाढती महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर राज्यात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात २५ ते ३१ दरम्यान आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरुद्ध महाराष्ट्रभर शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला संघटित करून प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर प्रचंड मोर्चे व निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शेतकरी-कामगार मोर्चाच्यावतीने देण्यात आली आहे.

रुपया ७७.७२ वर

परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार भारतीय शेअरबाजारात सतत विक्री करीत असल्याने आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरून ७७.७२ पर्यंत गेला. आज व्यवहार सुरु होतानाच रुपया ७७.७२ पर्यंत गेला. दिवसभरात त्याने ७७.७६ ते ७७.६३ अशी मजल मारली. व्यवहार बंद होताना कालच्या तुलनेत तो १० पैशांनी घसरला. बुधवारी त्याचा दर ७७.६२ असा होता. ही घसरगुंडी आणखी काही काळ होण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्सची धूळधाण

मुंबई : मंदीच्या भीतीने आज जगातील जवळपास सर्वच शेअर बाजार ढेपाळल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. बहुतांश कंपन्यांचे शेअर अडीच टक्क्यांहूनही जास्त कोसळले. सेन्सेक्स १,४१६.३० अंश तर निफ्टी ४३०.९० अंशांनी पडला. या पडझडीत आयटीसीचा शेअर मात्र वाढला. इंग्लंडमधील चलनवाढ जास्तच वेगाने झाल्याचे तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेचे प्रतिकूल आकडे समोर आल्याने आज सर्वत्र घबराटीचे वातावरण होते. अशातच जगभरातील प्रमुख बँका व्याजदर वाढवतील या भीतीने त्यात भर पडली. त्यामुळे दिवसअखेरीस सेन्सेक्स ५२ हजार ७९२.२३ अंशांवर तर निफ्टी १५ हजार ८०९.४० अंशांवर स्थिरावला. आज निफ्टीच्या प्रमुख ५० व सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी फक्त आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब व पॉवरग्रीड हे तीनच शेअर नफा दाखवीत होते. उरलेले सर्व प्रमुख शेअर तोटा दाखवित बंद झाले. आयटीसी ३.४३ टक्के म्हणजे ९ रुपये वाढून २७५ रुपयांवर बंद झाला. डॉ. रेड्डीज लॅब ३,९२८ रुपयांवर तर पॉवरग्रीड २२८ रुपयांवर बंद झाला.

आयटीला मोठा दणका

आज आयटी क्षेत्राच्या शेअरना मोठाच दणका बसला. विप्रो (बंद भाव ४५१), एचसीएल टेक (१,००९), टेक महिंद्र (१,१०८), इन्फोसिस (१,४२७), टीसीएस (३,२७०) यांच्यासह धातूनिर्मिती क्षेत्रातील टाटास्टील (१,१२२) हे शेअर पाच ते सव्वासहा टक्के घसरले. इंडसइंड बँक, कोटक बँक, महिंद्र आणि महिंद्र, एअरटेल हे शेअर तीन ते चार टक्के कोलमडले. तर बजाज फीनसर्व्ह, टायटन, अल्ट्राटेक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेटबँक, एचडीएफसी व एचडीएफसी बँक, मारुती या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के पडले. मुंबई शेअरबाजारातल्या एकूण शेअरपैकी आज २,५५७ म्हणजेच ७४.१८ टक्के शेअर तोट्यात बंद झाले. तर फक्त २२.६० टक्के म्हणजे ७७९ शेअर नफ्यात बंद झाले. उरलेल्या शेअरचे भाव कालच्याइतकेच राहिले. एलआयसीचा शेअरदेखील आज ३५ रुपयांनी घसरून ८४० रुपयांवर आला.

साडेसहा लाखकोटी रुपये बुडाले

आजच्या पडझडीमुळे सर्व गुंतवणुकदारांच्या एकूण सर्व शेअरचे मूल्य साडेसहा लाखकोटी रुपयांहून जास्त कमी झाले. काल बीएसई वरील सर्व शेअरचे एकूण मूल्य २५५ लाखकोटी रुपये (२५५,७७,४४५ कोटी रु.) होते तर आज दिवसअखेर ते २४९ लाखकोटी (२४९,१९,१८८ कोटी रु.) रुपये झाले.

जागतिक शेअरबाजार पडले

मंदीच्या भीतीने काल रात्री अमेरिकी शेअरबाजार चार ते पाच टक्के पडले होते. आज जवळपास सर्वच आशियाई शेअरबाजार एक ते दोन टक्के तर युरोपीय शेअर बाजार दोन टक्क्यांच्या आसपास घसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com