पुराचा अंदाज वर्तविण्यास गुगल करणार साह्य 

पीटीआय
बुधवार, 20 जून 2018

गुगलशी भागीदारी केल्याने भारतातील पुराचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. 
- नितीन गडकरी, केंद्रीय जलस्रोतमंत्री 

 

नवी दिल्ली : केंद्रीय जल आयोगाने तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलशी करार केला आहे. या करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुराचा अंदाज आणि पुराशी निगडित माहिती जलद मिळण्यास मदत होणार आहे. 

जलस्रोत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन करण्यास या भागीदारीमुळे मदत होईल. जल आयोगाशी गुगल वेगवेगळ्या क्षेत्रांतील तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करणार आहे. याचबरोबर पुराशी निगडित माहितीचे विश्‍लेषण करून गुगल ते आयोगाला देईल. गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुराचा अंदाज वर्तविणाऱ्या यंत्रणेत सुधारणा करण्यात येईल. गुगलच्या अर्थ इंजिनचा वापर करून पुराची परिस्थिती आणि पूर नियोजन याचा आढावा घेण्यात येणार आहे. 

पुराची समस्या सर्वाधिक भेडसाविणाऱ्या भागात इशारा देण्यासाठी आणि पूर येण्याचा वेळांचा अंदाज वर्तविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी मागणी होत होती. या पार्श्‍वभूमीवर हा करार करण्यात आला आहे. जल आयोगाकडून 2016 पर्यंत पुराचा अंदाज एकदिवस आधी वर्तविण्यात येत होता. त्यानंतर 2017 मध्ये पर्जन्यमानाच्या साह्याने पुराचा अंदाज तीन दिवस आधी वर्तविण्यात येऊ लागला होता. 

गुगलशी भागीदारी केल्याने भारतातील पुराचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. 
- नितीन गडकरी, केंद्रीय जलस्रोतमंत्री 

 

Web Title: Central Water Commission, Google tie up to better flood forecasting