अस्थानांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच तडकाफडकी बदली

वृत्तसंस्था
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील लाच घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आज (बुधवार) अंदमान-निकोबारला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या प्रकरणी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात येत आहेत.

नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील लाच घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचीच आज (बुधवार) अंदमान-निकोबारला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या प्रकरणी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात येत आहेत.

सीबीआय उच्चपदस्थांमध्ये उफाळलेला संघर्ष मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलेला असताना आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून केंद्राने एम. नागेश्वर राव यांची सीबीआयच्या प्रभारी संचालकपदी नेमणूक करून त्यांच्या हातात सगळी सूत्रे दिली होती. 

पोलिस उपअधिक्षक ए. के बस्सी यांची तर थेट अंदमान निकोबर येथे पोर्ट ब्लेअरला बदली करण्यात आली आहे, तर लवकरच रूजू होण्यासही सांगितले आहे. त्याच बरोबर अतिरिक्त पोलिस अधिक्षक एस. एस. गम यांची बदली मध्यप्रदेशातील जबलपूर येथे केली आहे. पोलिस उपनिरिक्षक मनिष कुमार सिन्हा. तरुण गौबा, जसबीर सिंग, अनिष प्रसाद, के. आर. चौलसिया, अमित कुमार आणि वरिष्ठ अधिकारी राम गोपाल, सतिष दागर, अरुण कुमार शर्मा, ए. साई मनोहर यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना व याच प्रकरणात खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोपावरून अटक केलेले उपअधीक्षक देवेंद्र कुमार दिल्ली उच्च न्यायालयात गेल्याने सीबीआयमधील वरिष्ठांचे अंतर्गत भांडण रंगले होते. त्यातच अस्थाना यांच्या मुलीच्या लग्नाचे प्रकरणही सीबीआयने उकरून काढले आणि हा सीबीआयचा आंतर्गत वाद चांगलाच रंगला आहे.

Web Title: Centre transfers CBI officers investigating top agency official Rakesh Asthana in bribery case