15 जुलैला झेपावणार 'चांद्रयान-2' इस्रोच्या अध्यक्षांची माहिती

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

15 जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून 51 मिनिटांनी हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्रीहरीकोटा येथून "जीएसएलव्ही एमके-3' या प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे उड्डाण होणार आहे.

नवी दिल्ली ः चंद्राला दुसऱ्यांदा गवसणी घालण्यास भारत सज्ज झाला असून, "चांद्रयान -2' या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून 51 मिनिटांनी हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्रीहरीकोटा येथून "जीएसएलव्ही एमके-3' या प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे उड्डाण होणार आहे.

"इस्रो' या भारतीय अंतराळ संस्थेने "चांद्रयान -2'चे पहिले छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे संशोधन करण्यासाठी भारत 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. "इस्रो'ने 2008 मध्ये "चांद्रयान-1'चे प्रक्षेपण केले होते. "चांद्रयान-2' ची अंतिम यशस्वी चाचणी तामिळनाडूच्या महेंद्रगिरीमध्ये केली होती. आता ही मोहीम प्रत्यक्षात येणार असून, 15 जुलै दरम्यान चांद्रयानाचे प्रक्षेपण होणार आहे. 6 सप्टेंबरला "चांद्रयान-2' चंद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल, असा विश्‍वास "इस्रो'ने व्यक्त केला आहे. "चांद्रयान-2' वैशिष्ट म्हणजे यात एकही उपकरण (पेलोड) विदेशी नाही. या यानाचे सर्व भाग संपूर्णपणे स्वदेशी आहेत. "चांद्रयान-1'च्या अवकाश यानात युरोपचे तीन व अमेरिकेचे दोन पेलोड होते. 

"चांद्रयान-2'चे ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत. या मोहिमेसाठी 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. 9 ते 16 जुलैदरम्यान चंद्र पृथ्वीपासून तीन लाख 84 हजार 400 किलोमीटर अंतरावर असेल. ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्रावर रोव्हर उतरविणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. या आधी अमेरिका, रशिया, चीनने ही कामगिरी केली आहे. "चांद्रयान-2'चा ऑर्बिटर चंद्राच्या 100 किलोमीटर उंचीवरून चकरा मारीत लॅंडर आणि रोव्हरकडून प्राप्त झालेली माहिती "इस्रो'च्या केंद्राकडे पाठविल. 

विक्रम लॅंडर 
इस्रो'चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे "विक्रम' हे नाव "चांद्रयान-2'मधील लॅंडरला देण्यात आले आहे. यात चार पेलोड आहेत. लॅंडर 15 दिवस वैज्ञानिक प्रयोग करेल. याची प्राथमिक रचना "इस्रो'च्या अहमदाबादमधील "स्पेस ऍप्लिकेशन सेंटर'ने केली आहे. नंतर बंगळूरमधील "यूआरएससी'ने ते विकसित केले आहे. 

प्रज्ञान रोव्हर 
"प्रज्ञान रोव्हर' हा 27 किलो वजनाचा रोबो असून, त्याच्यावरच मोहिमेची संपूर्ण जबाबदारी आहे. यात दोन पेलोड आहेत. चंद्रावरील पृष्ठभागावर रोव्हर सुमारे 400 मीटर अंतरावर असेल. या दरम्यान अनेक वैज्ञानिक प्रयोग करण्यात येणार आहेत. चंद्रावरून मिळालेली माहिती रोव्हर विक्रम लॅंडरवर पोचवेल. ही माहिती लॅंडर ऑर्बिटरला देईल. तेथून ती "इस्रो'च्या केंद्राकडे पाठविण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया 15 मिनिटांत पूर्ण होईल. म्हणजेच "प्रज्ञान'कडून पाठविलेली माहिती पृथ्वीपर्यंत पोचण्यास 15 मिनिटे लागतील. 

अकरा वर्षांनंतर मोहीम 
रशियाची अंतराळ संस्था "रॉसकॉसमॉस'ने 2007 मध्ये "चांद्रयान-2' मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी दाखविली होती. "इस्रो'ला लॅंडर देण्याचेही ठरले होते. मोहिमेला 2008 मध्ये भारत सरकारने परवानगी दिली. 2009 मध्ये "चांद्रयान-2'चा आराखडा तयार करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये प्रक्षेपण करण्याचा निर्णय झाला; मात्र "रॉसकॉसमॉस'कडून लॅंडर मिळू शकला नाही. त्यामुळे प्रक्षेपण 2016पर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर "रॉसकॉसमॉस'ने या मोहिमेतून काढता पाय घेतला. "इस्रो'ने स्वतःच स्वदेशी लॅंडर व रोव्हर तयार केले. मार्च 2018 मध्ये होणारे प्रक्षेपण काही चाचण्यांसाठी एप्रिल 2018 व नंतर ऑक्‍टोबर 2018 पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. यंदा जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये "चांद्रयान-2'चे प्रक्षेपण होणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते; मात्र प्रक्षेपण होऊ शकले नाही 

"चांद्रयान-2'चा कालावधी 
1 वर्ष ऑर्बिटर 

15 दिवस लॅंडर (विक्रम) 

15 दिवस रोव्हर (प्रज्ञान) 

3,877 किलो चांद्रयान-2चे एकूण वजन 

2,379 किलो ऑर्बिटर 

1,471 किलो लॅंडर 

27 किलो रोव्हर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan-2 to be launched on July 15, says Isro chief