'चांद्रयान 2' चंद्राच्या कक्षेत पोहोचले; महत्त्वाचा टप्पा पार!

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल. 

बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 

चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 

चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 to enter an Orbit around the moon