'चांद्रयान-2' घेणार 22 तारखेला झेप!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

भारताचा सर्वांत शक्तिशाली प्रक्षेपक असलेल्या 'जीएसएलव्ही मार्क-3'च्या मदतीने अब्जावधी जणांची स्वप्ने घेऊन 'चांद्रयान-2' अवकाशात झेप घेईल, असे 'इस्रो'ने म्हटले आहे.

बंगळूर : तांत्रिक बिघाडामुळे 15 तारखेला पहाटेचे उड्डाण रद्द झाल्यानंतर 'चांद्रयान-2' 22 तारखेला दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज ट्‌विटरवरून ही माहिती दिली. 

भारताचा सर्वांत शक्तिशाली प्रक्षेपक असलेल्या 'जीएसएलव्ही मार्क-3'च्या मदतीने अब्जावधी जणांची स्वप्ने घेऊन 'चांद्रयान-2' अवकाशात झेप घेईल, असे 'इस्रो'ने म्हटले आहे. 15 तारखेला पहाटे श्रीहरीकोटा येथील अवकाश केंद्रावरून उड्डाणाची तयारी झाली असताना उड्डाणाच्या 56 मिनिटे 24 सेकंद आधी प्रक्षेपकातील तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय झाला होता.

दहा ते बारा दिवसांत उड्डाण केले जाईल, असे 'इस्रो'ने त्याचवेळी जाहीर केले होते. मात्र, तंत्रज्ञांनी अल्पकाळातच तांत्रिक अडचण दूर करून सातच दिवसांत प्रक्षेपक उड्डाणासाठी सज्ज केला. उड्डाण रद्द झाल्यानंतरही जनतेने पाठिंबा कायम ठेवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे 'इस्रो'ने म्हटले आहे. 

'जीएसएलव्ही'च्या क्रायोजेनिक इंजिनच्या वरील टप्प्यात इंधन भरत असताना अडचण निर्माण झाल्याने उड्डाण रद्द झाले होते. योग्य वेळी निर्णय घेत उड्डाण रद्द करीत संभाव्य धोका टाळल्याबद्दल इतर अनेक शास्त्रज्ञांनी 'इस्रो'चे अभिनंदन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 launch at July 22