'सीसीटीव्ही' पुढे जाऊन तो 'मुद्दाम' करायचा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली.

चेन्नईः मित्रांची आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली. चोरी केली मुद्दामहून सीसीटीव्हीपुढे जाऊन उभा राहायचा. चोरीच्या गुन्ह्यात तो पकडला गेला पण पकडल्यामुळे जास्त खूष झाला कारण त्याला कारागृहामधील त्याचे मित्र परत मिळाले.

चेन्नईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्ञानप्रकाशम (वय 52) असे कैद्याचे नाव आहे. चोरीच्या आरोपाखाली ज्ञानप्रकाशमला मार्च महिन्यात अटक झाली होती. अटकेनंतर त्याची रवानगी पुझा येथील कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याची मित्रांशी गट्टी जमली. शिवाय, तेथील जेवणही त्याला आवडू लागले. पण, 29 जून रोजी त्याला जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्याला कारागृहातून बाहेर पडावे लागले. घरी आल्यानंतर त्याची कुटुंबिय त्याच्याकडे दुर्लक्ष करत. कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. शिवाय, कारागृहातून बाहेर आल्यानंतर मित्रांच्या आठवणीने बेचैन होऊ लागला. शिवाय, कारागृहातील चविष्ट जेवणाची आठवण यायची. पुन्हा कारागृहात जाता यावे म्हणून ज्ञानप्रकाशमने पुन्हा चोरी करण्याचे ठरवले.  

ज्ञानप्रकाशमने पश्चिम तंबारममधील कैलासपूरम फर्स्ट स्ट्रीट येथून एक दुचाकी चोरली. त्यानंतर तो त्या दुचाकीवरुन याच परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा. गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर तो रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांमधील पेट्रोल चोरायचा. पोलिसांना आपली ओळख पटावी म्हणून तो चोरी करायला गेल्यावर सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा मुद्दामहून दाखवायचा. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका दुचाकीमधील पेट्रोल चोरताना त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक करण्यात आल्यानंतर ज्ञानप्रकाशमने आपण केवळ पेट्रोल चोरले नसून दुचाकीही चोरीचीच असल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ज्ञानप्रकाशमला अटक करुन त्याची रवानगी पुन्हा पुझा येथील कारागृहात केली. त्यामुळे ज्ञानप्रकाशम पुन्हा आपल्या जुन्या मित्रांच्या सानिध्यात आला असून, खूष झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chennai man missed prison food his friends so much he stole a bike to get arrested