माध्यमांनी थोडे अधिक कष्ट घ्यावेत: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

लोकशाहीमध्ये राजकारणावर सखोल चर्चा होणे योग्यच आहे. मात्र, भारत हा देश राजकारण्यांहूनही बराच काही आहे. देशातील सव्वा अब्ज नागरिकांनी आजचा भारत घडविला आहे. त्यामुळे माध्यमांनी या सामान्य नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास मला अधिक आनंद होईल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

चेन्नई : "संपादकीय स्वातंत्र्य सत्याचा विपर्यास करण्याकरिता असू नये, प्रसार माध्यमांनी अचूक बातम्या प्रसिद्ध होतील, याची काळजी घ्यावी,' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील प्रसार माध्यमांना केले. प्रसार माध्यमांनी आपली विश्‍वासार्हता टिकविण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावेत, असेही ते म्हणाले.

तमिळ दैनिक "दिना थंथी'च्या (दैनिक टेलिग्राम) 75 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. या वेळी माध्यमांमध्ये, विशेषत: वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांबाबत मोदी यांनी आपले मते प्रदर्शित केली. ""कोणती बातमी महत्त्वाची, पहिल्या पानावर कशाला आणि किती स्थान द्यायचे, कशाकडे दुर्लक्ष करायचे, हे संपादकांचे काम असते. त्यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी असते. तंत्रज्ञानामुळे माध्यमे ही सर्वांपर्यंत सहजरीत्या पोचली आहेत. त्यामुळे विश्‍वासार्हता कायम ठेवण्यासाठी माध्यमांनाही थोडे अधिक कष्ट करणे आवश्‍यक आहे. संपादकीय स्वातंत्र्याचा वापर नागरी हितासाठी होणे आवश्‍यक आहे. माध्यमांनी म्हणूनच केवळ राजकारण्यांच्याच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या यशोगाथांना प्रसिद्धी द्यावी. महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार, माध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहेत. ही मोठी शक्ती निश्‍चित आहे; मात्र, त्याचा गैरवापर हा गुन्हा आहे,'' असे मोदी या वेळी म्हणाले. माध्यमे खासगी मालकीची असली तरी ते सार्वजनिक हिताचे काम करतात. बळाच्या नव्हे, तर शांततेच्या मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचे हे साधन आहे. त्यामुळे सरकार आणि न्यायव्यवस्थेइतकीच माध्यमांवरही सामाजिक जबाबदारी आहे, असेही मोदी म्हणाले.

टपाल खात्याची टेलिग्राम सेवा आता कालबाह्य झाली असली तरी, ही "टेलिग्राम' सेवा कायम वृद्धिंगत होईल, असे कौतुक मोदी यांनी "दिना थंथी'चे केले. मोदी यांचे आज चेन्नई विमानतळावर आगमन झाल्यावर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी रवाना झाले. मोदींच्या चेन्नई दौऱ्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला होता.

करुणानिधींना निमंत्रण
नरेंद्र मोदी यांनी आज द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास वीस मिनिटे चर्चा झाली. या वेळी राज्यपाल पुरोहित, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, द्रमुक नेते स्टॅलिन, खासदार कनिमोळी हे उपस्थित होते. मोदी यांनी करुणानिधी यांना दिल्लीत येण्याचेही निमंत्रण दिल्याचे समजते. करुणानिधी हे गेल्या वर्षापासून आजारी असून, ते सहसा घराबाहेर पडत नाहीत.

पुराबाबत साहाय्य करणार
गेल्या आठवडाभर पावसाने झोडपून काढलेल्या तमिळनाडूमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, यातून बाहेर येण्यासाठी राज्य सरकारला सर्वप्रकारची मदत केली जाईल, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी आज दिले. पावसामुळे राज्यात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला असून याबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले.

Web Title: chennai news Media should work a bit more: narendra Modi