अनिताच्या आत्महत्येनंतर राज्यभरात आंदोलन; सरकारचा निषेध

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

चेन्नई: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या "नीट'ला आव्हान देणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर तळिनाडूतील वातावरण तापू लागले आहे. विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि तमीळ संघटनांना शनिवारी केंद्र व राज्य सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन करीत नीट परीक्षा तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

चेन्नई: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या "नीट'ला आव्हान देणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर तळिनाडूतील वातावरण तापू लागले आहे. विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि तमीळ संघटनांना शनिवारी केंद्र व राज्य सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन करीत नीट परीक्षा तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

एस. अनिता (वय 17) दलित विद्यार्थिनीने वैद्यकीयसाठीच्या सामाईक पात्रता परीक्षेला (नीट) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वैद्यकीयसाठी प्रवेशाचे स्वप्न भंगल्याने अनिताने शुक्रवारी (ता. 1) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी ठिकठिकाणी रास्ता रोको केला. या वेळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस जी. रामकृष्णन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

"विदुथलाई चिरुथैगल कत्ची' या पक्षाने किलपूक येथे रास्ता रोको केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारी विशेष सुविधा रुग्णालयाला वेढा घालण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला. विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी केली. तमीळ संघटना "नाम तमिळार कत्ची'च्या महिला सदस्यांनी तिरुनेलवेल्ली जिल्ह्यात आंदोलन केले. कोईमतूर, सालेम, रामेश्‍वरम येथेही विद्यार्थी आणि युवक संघटनांनी "नीट' तातडीने रद्द करावी, अशी मागणी करीत आंदोलन केले. नीट परीक्षेचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्याने ती रद्द करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून जोर धरत आहे.

रोजंदारी मजुराची मुलगी असलेली अनिता बारावीमध्ये 1200 पैकी 1176 गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. वैद्यकीयसाठी नीट परीक्षा घेण्यास तिने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने नीट परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दाखविला होता. नीटमध्ये पुरेसे गुण न मिळाल्याने अनिताचे वैद्यकीय स्वप्न भंगले होते. यातून आलेल्या नैराश्‍यामुळे अखेर तिने काल (ता. 1) गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूबद्दल ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, कमल हसन आणि द्रमुक पक्षाचे नेते स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला होता.

कुटुंबीयांना सात लाखांची मदत
राज्य सरकारने अनिताच्या कुटुंबीयांना सात लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Web Title: chennai news student s anita suicide case and Movement across the tamilnadu