छत्तीसगडमध्ये आमदाराच्या हत्येत सहभागी असलेला नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

चकमकीत खात्मा झालेला नक्षलवादी वर्गीस याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम होते आणि तो सुरुंगद्वारे स्फोट घडवण्यात तज्ज्ञ होता. भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटातही वर्गीस याचा सहभाग होता.

रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाचे महासंचालक गिरधारी नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात आज सकाळी शोध मोहिम सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश आहे. एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चकमकीत खात्मा झालेला नक्षलवादी वर्गीस याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम होते आणि तो सुरुंगद्वारे स्फोट घडवण्यात तज्ज्ञ होता. भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटातही वर्गीस याचा सहभाग होता.

दरम्यान, दंतेवाडा जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता. शिवाय, सुरक्षा दलातील चार जवान हुतात्मा झाले होते. मंडावी हे बचेली गावातील प्रचारसभा आटोपून नकुलनारकडे परतत असताना शामगिरीजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. भीमा मंडावी हे 2008 मध्ये दंतेवाडा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले होते. 2013च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देवती कर्मा यांनी त्यांचा पराभव केला होता. 2018 मधील निवडणुकीत मंडावी पुन्हा विजयी झाले होते. बस्तर भागातील भाजपचे ते एकमेव आमदार होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhattisgarh dantewada encounter security forces killed naxal involved in bjp mla bhima mandavi murder