...अन् तिने पतीच्या मृत्यूची 'ब्रेकिंग न्यूज' वाचून दाखवली

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

बातमीदाराने सुप्रित कौर यांना फोनवर लाईव्ह सांगितले, की अपघातात पाच जखमी झाले होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झालेला आहे. ज्या क्षणी बातमीदार ही माहिती सांगत होता, त्या क्षणी कौर यांना समजून चुकले की गाडीचा तपशील आणि अपघातातील इतर तपशील त्यांच्या पतीच्या प्रवासाशी संबंधित आहेत. अन्य चौघांसह डस्टर मोटारीतून त्यांचे पती त्या दिवशी त्याच काळात महासमुंडमध्ये प्रवास करीत होते. 

रायपूर : ब्रेकिंग न्यूज आली की वाचून दाखवायची आणि त्यासंदर्भात संबंधित बातमीदारासोबत फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे लाईव्ह बोलायचे, हे टीव्ही अँकरचे रोजचे काम. छत्तीसगढमधील आयबीसी-24 या स्थानिक लोकप्रिय चॅनेलची न्यूज अँकर सुप्रित कौर यांच्याबाबतीत शनिवारची सकाळ अशीच होती. त्यांनी छत्तीसगढमधील महासमुंड जिल्ह्यातील एका अपघाताची बातमी वाचून दाखवली. संबंधित बातमीदाराला फोन केला आणि त्याच्याकडून आणखी तपशील घेत लाईव्ह बातमीमध्ये सांगितला. हजारो प्रेक्षकांसाठी हा क्षण कदाचित आणखी एका बातमीचा होता; तथापि कौर यांच्यासाठी हा असामान्य दुःखद प्रसंग होता. ज्या वाहनाचा अपघात झाला होता आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये कौर यांच्या पतीचा समावेश होता...

बातमीदाराने कौर यांना फोनवर लाईव्ह सांगितले, की अपघातात पाच जखमी झाले होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झालेला आहे. ज्या क्षणी बातमीदार ही माहिती सांगत होता, त्या क्षणी कौर यांना समजून चुकले की गाडीचा तपशील आणि अपघातातील इतर तपशील त्यांच्या पतीच्या प्रवासाशी संबंधित आहेत. अन्य चौघांसह डस्टर मोटारीतून त्यांचे पती त्या दिवशी त्याच काळात महासमुंडमध्ये प्रवास करीत होते. 

बातमी सुरू असताना कौर यांनी आपल्या भावना अतिशय नियंत्रित ठेवल्या. बातमीपत्र संपताच कौर उन्मळून गेल्या. 'सुप्रित अतिशय शूर स्त्री आहे. न्यूज अँकर म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आज जे काही घडले, त्याचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे,' असे कौर यांच्या एका सहकाऱयाने 'हिंदुस्थान टाईम्स' या वृत्तपत्राला सांगितले. कौर या गेली नऊ वर्षे आयबीसी-24 वाहिनीसाठी न्यूज अँकरचे काम करीत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा हर्षद कावडे यांच्याशी लग्न झाले होते. मुळच्या भिलाईच्या कौर सहकुटुंब रायपूरला राहतात. 

बातमीपत्र संपल्यानंतर तत्काळ कौर अपघातस्थळी रवाना झाल्या. 'बातमीचा तपशील समजत गेला, तस तसे कौर यांना आपला नवरा गेला असल्याचे जाणवले. मात्र, त्यांनी बातमीपत्र पूर्ण केले. त्यानंतर त्या स्टुडिओतून बाहेर आल्या आणि नातेवाईकांना फोन करू लागल्या,' असे चॅनेलच्या एका वरीष्ठ संपादकाने सांगितले. बातमीपत्र चॅनेलवरून दाखवले जात असताना कौर यांच्या सहकाऱयांना अपघाताची कल्पना आली होती. '...पण आम्ही तिला सांगू शकत नव्हतो. नवरा गेला तुझा, हे तिला कसे सांगायचे याची भीती वाटत होती...', असे आणखी एका सहकाऱयाने सांगितले. 

Web Title: Chhattisgarh TV anchor reads breaking news of her husband’s death

व्हिडीओ गॅलरी