भाजपच्या विजयरथाला धक्का; छत्तीसगड, राजस्थान गमावले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल काँग्रेसकडे झुकला आहे.

नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली. 

गेल्या डिसेंबरमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतरित्या स्वीकारली. त्यानंतर प्रथमच निवडणुकीमध्ये 24 अकबर रोड येथे जल्लोष सुरू झाला आहे. सकाळी मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात काँग्रेसला पाचही राज्यांमध्ये आघाडी मिळाली होती. तेव्हापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला होता; तर दुसरीकडे भाजपच्या गोटात तुलनेने सामसूम आहे. 

तेलंगणामध्येही काँग्रेसने सुरवातीला आघाडी घेतली होती. मात्र, टीआरएसने पुढील तासाभरात मुसंडी मारत पुन्हा सत्ता स्थापनेच्या जवळ मजल मारली. सकाळी दहापर्यंतच्या कौलांनुसार, तेलंगणामध्ये टीआरएसने 76 जागांवर आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेसला 30, तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. 

मध्य प्रदेशमध्ये भाजपला 109, काँग्रसला 108, तर इतरांना 13 जागांवर आघाडी आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसमध्ये 58, भाजपला 23 आणि इतरांना नऊ जागांवर आघाडी मिळाली आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस 98, भाजप 79 तर इतरांना 17 जागांवर आघाडी आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांतील साडेआठ हजारांहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या मतमोजणीनंतर निश्‍चित होणार आहे. सर्वांत जास्त म्हणजे 2,907 उमेदवार मध्य प्रदेशात होते. येथेच सर्वाधिक 65,367 यंत्रांचा वापर केला गेला.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत.

राजस्थानमध्ये शुक्रवारी 72.37 टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. 

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल काँग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये चुरशीची लढत आहे. या निवडणुकांवर तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागला आहे.

Web Title: Chhattishgarh Rajasthan Lost by BJP and Congress in lead