जे. डे. हत्या प्रकरणी छोटा राजन दोषी; जिग्ना वोरा, पॉल्सन निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन जे. डे. यांच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सुत्रधार असल्याचे सिध्द झाले. त्यामुळे राजनला दोषी करार देण्यात आला.

पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला दोषी ठरविण्यात आले आहे. पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 
सबळ पुराव्यांअभावी त्यांची सुटका करण्यात आली. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे.  

7 वर्षांपूर्वी जे. डे. यांची पवई येथील निवास्थानी जात असताना हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे जे. डे. यांनी अखेरचा श्वास घेतला.  

पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन जे. डे. यांच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सुत्रधार असल्याचे सिध्द झाले. त्यामुळे राजनला दोषी करार देण्यात आला. त्याला काय शिक्षा सुनावली जाणार आहे यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

सुनावणीसाठी छोटा राजन व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे कोर्टात उपस्थित होता. जे. डे. हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉलसन आणि जिग्ना वोरा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि छोटा राजन ला दोषी ठरविण्यात आले. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया हे 9 जणांवर दोष सिद्ध झाले आहेत. छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते, पण ही शक्यता कमी आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Chhota Rajan Is Guilty In J. Dey Murder Case Final Verdict