मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पत्रकार परीषद घेणार?

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पत्रकार परीषद घेणार?

पणजी- गोव्यातील खाणी सुरु होणार की नाही हे समजण्यासाठी चार दिवस थांबावे लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पत्रकार परीषद घेणार आहेत असे उपसभापती मायकल लोबो यांचे म्हणणे आहे.

पर्वरी येथे आज राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "मला वाटते याविषयी मुख्यमंत्र्यांनीच नेमकी माहिती देणे आवश्‍यक आहे. तेच याचे योग्यप्रकारे उत्तर देऊ शकतात कारण खाण खाते त्यांच्याकडे आहे. येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन खाणकाम सुरु होईल की नाही हे सांगतील.

स्वादुपिंडाच्या आजाराने पिडीत मुख्यमंत्री गेले दोन महिने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आलेले नाहीत. आजवर अधिकृतपणे त्यांनी आपल्या निवासस्थानी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. मात्र त्यांनी माध्यमांसमोर येणे टाळले आहे.

ते कार्यरत असल्याचा पुरावा कॉंग्रेसने जरा जोरदार शब्दात मागितल्यानंतर बैठक घेत असल्याची आणि सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेतल्याचे अशी तीन छायाचित्रे मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आली. एका बाजूनेच घेतलेल्या त्या छायाचित्रांत ते उशांच्या आधारे सोफावर बसलेले दिसून येत होते. यामुळे त्यांची प्रकृती कमालीपेक्षा ढासळल्याचे अनुमान अनेकांनी काढले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लोबो यांनी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील असे सांगितल्याने उत्सुकता वाढली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही त्यांची ध्वनीचित्रफीत जारी न करता केवळ 13 सेकंदाची ध्वनीफित जारी करण्यात आली होती. त्यातील त्यांचा क्षीण आवाज होता.

गेल्या 14 ऑक्‍टोबरला ते दिल्लीतील एम्समधून हवाई रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर गोव्यात आले तेव्हापासून गोमेकॉतील एका सीटीस्कॅनसाठी वगळल्यास त्यांनी घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. एका राष्ट्रीय दैनिकाने खाणी सुरु करण्यासाठी खाण व खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरूस्ती करण्याचा केंद्रीय खाण मंत्रालयाचा प्रस्ताव केंद्रीय कायदा मंत्रालयाने फेटाळल्याचे वृत्त आज पुन्हा दिल्यानंतर खाणी सुरु होणार की नाही हा विषय ऐरणीवर आला आहे. याविषयावरून कॉंग्रेसने भाजप आघाडी सरकारवर याअगोदरच टीका केली आहे. भाजप सत्य लपवून, खाणी सुरु होणार असे सांगून जनतेला फसवत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. राज्यातील खाणकाम सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारीला दिलेल्या आदेशानंतर 15 मार्चपासून बंद झाले आहे. तेव्हापासून राज्य सरकार खाणी सुरु होणार असे जनतेला सांगत आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com