
चीननेच सीमेवर भारताला डिवचलं; India-China वादावर बायडेन सरकारचं मोठं विधान
नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर बिजिंगनेच चिथावणीखोर पावले उचलली असून, भारतासोबत काम करण्याचा अमेरिकेचा इरादा असल्याचे व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जागतिक स्तरावर एक महान राष्ट्र म्हणून भारत काय भूमिका बजावेल, हे समजून घेण्याची गरज असल्याचंही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे उप सहाय्यक आणि इंडो-पॅसिफिक प्रकरणांचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी वॉशिंग्टन स्थित थिंक टँकला सांगितले.
आम्हाला भारतासोबतच्या संबंधांना प्रोत्साहन आणि पाठिंबा द्यायचा आहे. आम्हाला हे नातं अधिक घट्ट करायचं आहे, जे आधीच खूप मजबूत आहे. दोन्ही देशांमधील लोकांचे संबंध अमेरिकन लोकांच्या इतर देशांच्या लोकांच्या तुलनेत सर्वात मजबूत असल्याचंही ते म्हणाले.
भारत-चीन सीमेवर घुसखोरी आणि संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत, असे थिंग टँक सेंटर फॉर अ न्यू अमेरिकन सिक्युरिटीने एका अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील शत्रुत्वाच्या वाढत्या भीतीचा परिणाम अमेरिका आणि या दोन आशियाई महासत्तांमधील इंडो-पॅसिफिक धोरणावर होत आहे.
या अहवालानुसार, भारतीय अधिकाऱ्यांना वाटतं की, पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर आणि चीनला लागून असलेल्या पूर्व सीमेवर भारताला गुंतवून चीनच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान देण्याची भारताची तयारी आणि क्षमतेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे.