नौदलाची ताकद वाढविण्यासाठी चीन प्रयत्नशील

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

सागरी मोहिमांसाठी आवश्‍यक असलेली गुप्त व संवेदनशील माहिती गोळा करण्याची क्षमता या नौकांमध्ये आहे. या नौकेबरोबरच चीनने एक विमानवाहु नौका बांधत असल्याची घोषणाही केली आहे...

बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादासंदर्भात दक्षिण पूर्व आशियामध्ये असलेल्या राजनैतिक तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून आज (गुरुवार) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

चीनच्या नौदलामध्ये आणखी एका नव्या "इलेक्‍ट्रॉनिक रिकनेसन्स' नौकेचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी मालकीच्या माध्यमांनी दिले आहे. याबरोबरच, चीनच्या सैन्यामध्ये आता अशा स्वरुपाच्या नौकांची संख्या एकूण सहा झाली आहे. सागरी मोहिमांसाठी आवश्‍यक असलेली गुप्त व संवेदनशील माहिती गोळा करण्याची क्षमता या नौकांमध्ये आहे. सीएनएस कैयांगशिंग वा मिझार असे नामकरण करण्यात आलेल्या या नौकेस क्विंगदाओ या पूर्व चीनमधील बंदराजवळ औपचारिकरित्या चिनी नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे, "चायना डेली'ने म्हटले आहे.

या नौकेबरोबरच चीनने एक विमानवाहु नौका बांधत असल्याची घोषणाही केली आहे. सध्या चिनी नौदलामध्ये लिओनिंग ही एकच विमानवाहु नौका आहे. लिओनिंग ही ही मूळची रशियन विमानवाहु नौका आहे.

दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अमेरिकन व जपानी जहाजांवर चिनी नौदलाकडून नियमितरित्या लक्ष ठेवण्यात येत असल्याचे चीनने म्हटले आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या 90 टक्‍क्‍यांपेक्षाही भागावर चीनने दावा सांगितला आहे. यामुळे दक्षिण पूर्व आशियामधील इतर देश व चीनमधील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रात आक्रमक धोरण राबविण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.

Web Title: China Launches New Electronic Intelligence Naval Ship

टॅग्स