चीनची कुरापत; सीमेवर भारतीय सैनिकांना लाऊड स्पीकरवर ऐकवली पंजाबी गाणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

चीनकडून सातत्याने कुरापती केल्या जात असून भारतावर दबाव आणण्यासाठी चीनकडून सातत्याने काही ना काही खेळी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणावाचे वातावरण आहे. चीनकडून सातत्याने कुरापती केल्या जात असून भारतावर दबाव आणण्यासाठी चीनकडून सातत्याने काही ना काही खेळी केली जात आहे. फिंगर 4 याठिकाणी चीनने आता लाऊडस्पीकर लावले असून त्यावर पंजाबी गाणी लावल्याची माहिती समोर आली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चीनने फिंगर 4 या परिसरामध्ये लाऊडस्पीकर लावले आहेत. भारतीय जवानांच्या देखरेखीखाली असणाऱ्या परिसरामध्ये जाणीवपूर्वक लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी लाऊन भारतीय लष्कराचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सैन्य या गाण्यामुळे शिथिल होईल असा चीनचा कयास आहे. सैन्यावर दडपण आणण्यासाठी हा मार्ग वापरला जात असल्याचं बोललं जात आहे. 

मागील महिन्याभरात पूर्व लडाख परिसरात तीन वेळा चकमकी घडून आल्या आहेत. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर असणाऱ्या फिंगर्सवर चीनला आपलं वर्चस्व मिळवायचं आहे आणि म्हणून चीन सातत्याने या कुरापती करत असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. 8 सप्टेंबर रोजी सीमाभागात या दोन्ही देशांमध्ये गोळीबार झाला होता. दोन्हीही बाजूनी जवळपास 100 ते 200 राऊंडची फायरिंग झाली होती.  

हे वाचा - 'लॉकडाऊनचा देशाला नक्की काय फायदा झाला?'

29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकड्या ताब्यात घेतल्या. या परिसरात आपलं वर्चस्व  प्रस्थापित करण्यासाठी म्हणून चीन बरेच प्रयत्न करत आहे. LAC वरील चीनी सैन्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने दक्षिण किनाऱ्यावरील उंच भागात भारतीय सैन्य तैनात केले गेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China play Punjabi songs for Indian troops on loudspeaker