अम्मांच्या उत्तराधिकारी चिनम्मा

पीटीआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

चेन्नई -  तमिळनाडूमधील सत्तारूढ अण्णा द्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या विश्‍वासू सहकारी शशिकला नटराजन (चिनम्मा) यांची निवड करण्यात आली.

पक्षाच्या गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शशिकला यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्याच्या ठरावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आणि शशिकला यांनीही हा प्रस्ताव तातडीने स्वीकारला.

चेन्नई -  तमिळनाडूमधील सत्तारूढ अण्णा द्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या विश्‍वासू सहकारी शशिकला नटराजन (चिनम्मा) यांची निवड करण्यात आली.

पक्षाच्या गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शशिकला यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्याच्या ठरावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आणि शशिकला यांनीही हा प्रस्ताव तातडीने स्वीकारला.

जयललिता यांच्या निधनानंतर आज पहिल्यांदाच अण्णा द्रमुकची सर्वसाधारण बैठक झाली. यामध्ये शशिकला यांची औपचारिकरीत्या सरचिटणीसपदी सर्वसहमतीने निवड करण्यात आली. पक्षाच्या सरचिटणीस आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते.

पक्षाचे खजिनदार आणि मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी सांगितले, की पक्षाच्या नियमांनुसार, चिनम्मा यांची अण्णा द्रमुकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संदर्भात सर्वसाधारण बैठकीत सर्वसहमतीने एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 60 वर्षे वयाच्या शशिकला यांची लवकरच औपचारिकरीत्या सरचिटणीसपदी निवड केली जाईल, असे ठरावात म्हटले आहे.

पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जयललिता यांच्या पोएस गार्डन येथील निवासस्थानी शशिकला यांची भेट घेतली आणि पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसह लोकसभेतील उपनेते एम. थम्बीदुराई आणि इडाप्पडी के. पालनीसामी यांनी शशिकला यांना त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव दिला. भावनावश झालेल्या शशिकला यांनी सर्व नेत्यांना जयललिता यांच्या छायाचित्रासमोर नेले आणि फुलांनी आदरांजली वाहिली. "लॉंग लीव्ह चिनम्मा'च्या जोरदार घोषणाबाजीत शशिकला यांनी नेते आणि समर्थकांच्या इच्छेनुसार बैठकीतील निर्णय मी स्वीकारत असल्याचे नमूद केले. पक्षाचे वरिष्ठ नेते पी. एस. रामचंद्रन यांनी याबाबतची माहिती दिली.

पक्षाच्या बैठकीत 14 ठराव मंजूर करण्यात आले असून, यामध्ये शशिकला यांच्या नियुक्तीबाबतचाही ठराव आहे. अम्मांचे मार्गदर्शन लक्षात ठेवा आणि चिनम्मा (शशिकला) यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करा, असे आवाहन या ठरावाद्वारे कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

जयललितांचा वाढदिवस राष्ट्रीय कृषी दिन
अण्णा द्रमुकच्या सर्वसाधारण बैठकीत 14 ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये जयललिता यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा या ठरावासह जयललिता यांना मॅगसेसे पुरस्कार आणि जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असेही ठराव मंजूर करण्यात आले.

 

Web Title: Chinamma is Jayalalithas successor