तमिळनाडूत चिन्नम्माच 'पॉवरफुल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

शशिकलांच्या पाठीशी 131 आमदार; खजिनदार पदावरून पनीरसेल्वम यांना हटविले

शशिकलांच्या पाठीशी 131 आमदार; खजिनदार पदावरून पनीरसेल्वम यांना हटविले

चेन्नई - तमिळनाडूत काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वादळ लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पनीरसेल्वम यांनी आज दिवंगत नेत्या जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे राजकीय वर्चस्वाच्या लढाईत चिन्नम्मा शशिकला या पनीरसेल्वम यांना भारी पडल्या असून, आज त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीस 131 आमदार उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी पनीरसेल्वम यांना खोटे ठरवित पक्षातील एकजूट अभेद्य ठेवण्याचा निर्धार बोलून दाखविला.

तत्पूर्वी पनीरसेल्वम यांनी मंगळवारी रात्री जयललिता यांच्या स्मारकास भेट देऊन प्रार्थना केल्यानंतर थेट शशिकला यांना धारेवर धरले होते. या घटनाक्रमानंतर शशिकला यांनी बुधवारी पनीरसेल्वम यांची पक्षाच्या खजिनदार पदावरून तातडीने हकालपट्टी केली. पनीरसेल्वम यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला असला तरी, त्यांच्या पाठीशी केवळ पन्नास आमदारांचेच बळ आहे. दरम्यान, आपल्या गोटातील आमदार फुटू नयेत म्हणून शशिकला यांनी त्यांची रवानगी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केल्याचे समजते. राज्यपाल विद्यासागर राव चेन्नईमध्ये येईपर्यंत या आमदारांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार आहे.

शशिकला समर्थकांना भेटल्या
पनीरसेल्वम यांच्या बंडानंतर "अण्णा द्रमुक'च्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी आज तातडीने पक्षाच्या मुख्यालयामध्ये समर्थक आमदारांची बैठक घेतली, या बैठकीस 134 पैकी 131 आमदार उपस्थित होते. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, ""कोणतीही शक्ती "अण्णा द्रमुक'ला फोडू शकत नाही. आपला पक्ष सध्या कसोटीला सामोरे जात आहे. अम्मांनी सांगितलेली तत्त्वे आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला एकत्रित राहायला हवे.'' या वेळी बहुतांश आमदारांनी चिन्नम्मा याच मुख्यमंत्री होतील, असा आशावाद व्यक्त केला.

शशिकला म्हणाल्या

  • अण्णा द्रमुकमध्ये विश्‍वासघातकी जिंकणार नाहीत
  • "द्रमुक'च आपला पक्ष अस्थिर करत आहे
  • पक्ष अथवा मी कोणासमोरही गुडघे टेकणार नाही
  • पनीरसेल्वम यांची "द्रमुक'शी हातमिळवणी
  • जयललितांनीच पनीरसेल्वम यांना मोठे केले
  • आम्ही योग्य वेळी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करू
  • आता आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा खरा चेहरा दिसतो आहे
  • "अण्णा द्रमुक' फोडण्याची ताकद कुणातही नाही

मुख्यमंत्री पद गेल्यानंतर पनीरसेल्वम यांनी आदळआपट करायला सुरवात केली, चिन्नम्मा यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही.
- अवदी कुमार, प्रवक्‍ते अण्णा द्रमुक

शशिकला याच खऱ्या जयललितांच्या वारसदार आहेत, त्यांना प्रशासनाचा अनुभव असल्यानेच त्या चांगल्या प्रशासन देऊ शकतील.
- एस. सेम्मालाई, अण्णा द्रमुकचे नेते

Web Title: Chinamma is powerful in Tamilnadu