भारतातील औषध कंपन्यांना चीनची दारे उघडणार

पीटीआय
शनिवार, 14 जुलै 2018

भारतीय फार्मा कंपन्यांना चीनकडून दिले जाणारे नियामक परवाने अर्ज सादर केल्यापासून सहा महिन्यांच्या आत प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे. 

- दिनेश दुआ, अध्यक्ष, फार्मएक्‍सिल 

नवी दिल्ली : अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर नव्या व्यावसायिक भागीदारांच्या शोधात असलेल्या चीनकडून भारतातील फार्मा कंपन्यांना नियामक परवाना देण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय निर्यात प्रोत्साहन गटाने आज दिली. 

भारत-चीनमध्ये याबाबत अद्याप कोणताही करार झालेला नसला तरी, भारतीय कंपन्यांच्या औषधांची चीनमध्ये विक्री होण्याचे सकारात्मक संकेत आहेत. व्यापार युद्धामुळे चीन सध्या सर्व अटी स्वीकारण्याच्या स्थितीत असल्याची माहिती निर्यात गटातील एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.

भारतातील कंपन्या चीनला जेनेरिक औषधे, सॉफ्टवेअर, साखर तसेच, विविध प्रकारचा तांदळाची निर्यात करण्यासाठी उत्सुक असून, त्यासाठी नियामक परवाना मिळणे हे त्यांच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. भारत हा जेनेरिक औषधांची निर्यात करणारा प्रमुख देश असून, 2017-18 या आर्थिक वर्षात भारतातून सुमारे 17.3 अब्ज डॉलरची औषधे निर्यात झाली आहे.

Web Title: Chinese doors to Indian drug companies to open