गुगलने साकारले 'चिपको आंदोलन'चे डुडल

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

जंगलातील मोठमोठी वृक्ष वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आजही महत्त्वपूर्ण मानला जातो. सरकारचे ठेकेदार झाडं कापायला असंख्य लोक घेऊन यायचे, त्यावेळी गावातील महिला, लहान मुले त्याला विरोध करत झाडांना मिठी मारून उभ्या रहायच्या.

नवी दिल्ली : चिपको आंदोलनाला आज 45 वर्षे पूर्ण झाल्याने गुगलने आपल्या आजच्या डुडलवर चिपको आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे. उत्तराखंडमध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल या गावात 1973 साली सर्वप्रथम चिपको आंदोलनाची सुरवात झाली. जंगल व झाडे वाचवण्यासाठी हे आंदोलन खेड्यातील ग्रामस्थांनी सुरू केले. 

जंगलातील मोठमोठी वृक्ष वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आजही महत्त्वपूर्ण मानला जातो. सरकारचे ठेकेदार झाडं कापायला असंख्य लोक घेऊन यायचे, त्यावेळी गावातील महिला, लहान मुले त्याला विरोध करत झाडांना मिठी मारून उभ्या रहायच्या. 'पेड कटने नहीं देंगे'च्या घोषणा द्यायच्या. यामुळे अनेक जंगले, झाडे वाचली. त्या झाडांवर राहणारे पशुपक्षी वाचले. महिलांनी दाखवलेल्या या धैर्याचे आजही कौतुक होते. 

 Chipko Movement

अलकनंदा खोऱ्यातील जंगलाच्या एका भूभागात ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, पण सरकारने ती नाकारली. त्याऐवजी क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला हा भूभाग देण्याचे निश्चित करण्यात आले. यालाच विरोध म्हणून चिपको आंदोलनाची सुरवात झाली. पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनात पुढाकार घेऊन सरकारला विरोध केला. त्याचबरोबर गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया या आंदोलनात उतरल्या. गौरादेवीने आसपासच्या गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले. 

इतका विरोध होऊनही वृक्षतोडीसाठी जेव्हा काही मजुरांना जंगलात पाठवले गेले त्यावेळी शिताफीने गावातील पुरूष मंडळींना दुसरीकडे बोलावून घेण्यात आले, त्यामुळे गावात फक्त महिला व लहान मुलेच राहिली. तरी त्यांनी झाडे तोडण्यास विरोध केला. महिला व लहान मुले झाडांना चिटकून उभी राहिली. या महिलांना ठेकेदारांनी विवस्त्र करण्याच्या देखील धमक्या दिल्या. पण महिला मागे हटल्या नाहीत व मजूरांनी माघार घेतली. पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने भारतात केले गेलेले हे पहिलेच आंदोलन होते. 

आज या आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण झाली. गुगलच्या या डुडलमुळे आज हे आंदोलन जगभरात पोहोचले. भारतीयांच्या स्मरणात राहिल असे हे अनोखे आंदोलन होते.

Web Title: chipko andolan completed 45 years google creates doodle of chipko andolan