"चिटफंडातील नेत्यांची माझ्यावर टीका - मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

ते म्हणाले,""एका बाजूने सीमेपलीकडील दहशतवादामुळे जवान हुतात्मा होत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक दहशतवादामुळे युवा पिढी उद्‌ध्वस्त होत आहे. बनावट नोटा देशात आणल्या जात होत्या. नोटा बंदीमुळे अमली पदार्थांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.''

आग्रा- ""कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड गैरव्यवहारामागे असलेले नेते नोटाबंदीच्या माझ्या निर्णयावर टीका करीत आहेत. त्यांनाच या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे,'' अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता केली. त्याचवेळी मोदी यांनी कॉंग्रेसलाही फैलावर घेतले. ते म्हणाले, "" सत्ता गमाविण्याची भीती असल्यानेच काळ्या पैशांच्या बाबतीत गेली सत्तर वर्षे सरकारे गप्प राहिली.''

येथे आयोजित परिवर्तन रॅलीत मोदी बोलत होते. ""जनधन खात्यांचा वापर श्रीमंतांना त्यांचे पैसे ठेवण्यासाठी करू देऊ नका. यामुळे सामान्य लोक अकारण कायद्याच्या कचाट्यात सापडतील, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला. नोटाबंदीमुळे होणाऱ्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना मोदी यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नाही. बॅनर्जी यांचे नाव न घेता ते म्हणाले, ""माझ्याविरुद्ध कोणत्या प्रकारचे लोक बोलत आहेत? चिटफंड व्यवहारात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत हे काय देशाला माहिती नाही का? चिटफंडात लाखो गरिबांनी पैसे गुंतविले होते. मात्र, राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने गरिबांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. चिटफंडात नुकसान झाल्याने शेकडो कुटुंबप्रमुखांनी आत्महत्या केली. यांचा इतिहास पहा आणि हे मला प्रश्‍न विचारत आहेत.''

कॉंग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, ""आधिच्या सरकारांनी काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यांना देशापेक्षाही स्वतःची सत्ता जाईल याचीच जास्त काळजी होती. देश किती काळ शांत बसणार? आधिच्या सरकारांनी त्यांना 70 वर्षे शांत बसविले. त्यांना या रोगाची माहिती नव्हती अशातला भाग नव्हता. मात्र, त्यांना देशापेक्षा सत्तेचीच काळजी होती.''

ते म्हणाले,""एका बाजूने सीमेपलीकडील दहशतवादामुळे जवान हुतात्मा होत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक दहशतवादामुळे युवा पिढी उद्‌ध्वस्त होत आहे. बनावट नोटा देशात आणल्या जात होत्या. नोटा बंदीमुळे अमली पदार्थांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.''

भ्रष्ट लोकांचे पैसे खात्यात ठेवू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ""नोटा बंदीचा निर्णय लोकांना त्रास देण्यासाठी घेतलेला नसून गरिबांना, प्रामाणिक लोकांच्या मदतीसाठी घेतला आहे. भ्रष्ट लोक तुमच्याकडे अडीच लाख रुपये घेऊन येतील. तुमच्या बॅंक खात्यात ते ठेवून सहा महिन्यांनी तुमच्याकडून दोन लाख रुपये घेतील आणि पन्नास हजार ठेवण्यास सांगतील. पण, कृपया अशा लोकांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. कायदा कठोर आहे. ज्यांच्या खात्यात हे पैसे असतील त्यांना उत्तर द्यावे लागेल. अशा वेळी भ्रष्ट लोक हात झटकतील. यामुळे गरिबांना अनावश्‍यक त्रास होईल. त्यांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे.

Web Title: chit fund leaders criticizing me says Narendra Modi