फोंड्यात अंमली पदार्थ विरोधात नागरिक एकवटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

फोंड्यातील नागरिकांनी एकत्र येऊन फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ही संघटना उभी केली असून अंमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी आवश्‍यक भासल्यास सुसंवाद साधण्याची तयारी या संघटनेने ठेवली आहे.

फोंडा (गोवा) - गोव्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या फोंडा शहरात आता किनारपट्टीवरून अंमली पदार्थाचे लोण पोचले आहे. अंत्रुज महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंडा तालुक्याच्या ग्रामीण भागातही अमली पदार्थ पोचले असून या घातक व्यसनांची शिकार विद्यार्थी वर्ग होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर फोंड्यातील नागरिकांनी एकत्र येऊन फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ही संघटना उभी केली असून अंमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी आवश्‍यक भासल्यास सुसंवाद साधण्याची तयारी या संघटनेने ठेवली आहे. दरम्यान, मागच्या दोन ते तीन महिन्यात गांजा व्यवहारासंबंधी 14 प्रकरणे फोंडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहेत, आणि अटक करण्यात आलेले सर्व संशयित आरोपी हे बिगर गोमंतकीय आहेत.

अंमली पदार्थ सेवनाचे प्रकार पूर्वी केवळ किनारपट्टी भागातच व्हायचे. किनारपट्टी भागात अंमली पदार्थाचा व्यवहार फोफावला असला तरी आता हे लोण शहरांबरोबरच ग्रामीण भागापर्यंत पोचल्यामुळे विशेषतः पालक वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अंमली पदार्थ व्यवहारात चरसचा वापर यापूर्वी सर्वाधिक व्हायचा, मात्र गेल्या पाच वर्षांतील घटना तपासल्या तर चरसपेक्षा गांजाचा व्यवहार वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
देवदेवतांचा प्रदेश असलेल्या आणि निसर्गसुंदर असलेल्या अंत्रुज अर्थातच फोंडा महालात अंमली पदार्थाने शिरकाव केल्यामुळे या चिंतेत अधिकच भर पडली असल्याचे काही पालकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. महाविद्यालयांबरोबरच विद्यालयांतही या घातक वस्तूचा वापर होण्यासारख्या काही घटना मागच्या काळात घडल्या असल्यामुळे आता फोंड्यातील जबाबदार नागरिक, पालक तसेच शाळा, विद्यालये असलेल्या संस्थांचे चालक सजग झाले आहेत. फोंड्यात नव्याने सुरू झालेल्या फोरम अगेन्स्ट ड्रग्ज या संघटनेनेही फोंडा तालुका पूर्णपणे ड्रग्जमुक्त करण्याचा विडा उचलला असून या संघटनेत उद्योग, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच विविध स्तरातील जबाबदार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. संघटनेच्या ड्रग्जमुक्त फोंडा या संकल्पनेचे पालक व शिक्षकांनी स्वागत केले आहे. 

टपऱ्यांवर नजर ठेवा!
फोंड्यात चालणाऱ्या टपऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवण्याची गरज फोंडावासीयांनी व्यक्त केली आहे. काही गाडे तसेच बसचालकांकडेही यापूर्वी अंमली पदार्थ सापडले असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करणे आवश्‍यक असल्याचे फोंडावासीयांचे मत आहे. बसस्थानक परिसरातही संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या नागरिकांकडे गांजासारख्या अंमली पदार्थाचा साठा मिळत असल्यामुळे त्यादृष्टीनेही तपास व्हायला हवा.

फोंड्यात सर्वाधिक गांजा...!
फोंड्यात आतापर्यंत अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यात सर्वाधिक गांजाचे प्रमाण सापडले आहे. गेल्या पाच वर्षात केवळ एकदाच चरस सापडला असून गांजाचे प्रमाण मात्र सर्वाधिक आहे. मागच्या दोन महिन्यांत तर गांजा पकडण्याची 14 प्रकरणे पोलिसांत नोंद करण्यात आली आहेत.

युवा वर्गावर हवे लक्ष!
महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकांवर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. युवा वर्गात सिगारेट ओढण्याचे प्रकारही वाढीस लागले असून दुचाकीवरुन स्टंट करण्याचे प्रकार तर सर्रासपणे होत असल्याने वाहतूक पोलिस तसेच वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी खास करून फोंडा महालातील विविध उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. 

मुले व्यसनाधीन होऊ नयेत यासाठी पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. - माधव सहकारी (उद्योजक)
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Citizens mobilized against drug addiction at goa