'पुढचे पाऊल' संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा दिल्लीत सत्कार

Pudhache-Paul
Pudhache-Paul

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ध्येय निश्चितीबरोबरच प्लॅन बी तयार ठेवा. प्रशासकीय सेवेचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन स्वतःत योग्य ते बदल करा. एक तरी परदेशी भाषा शिका. या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर सल्ल्यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या साठहून अधिक मराठी तरुणांचा सत्कार सोहळा शनिवारी (ता.24) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पार पडला.

'पुढचे पाऊल' या संस्थेतर्फे हा सत्कार सोहळा दिल्लीतील मावळणकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली आणि देशभरातील वेगवेगळ्या प्रशासकीय सेवांमधील मराठी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन 'पुढचे पाऊल' या संस्थेची स्थापना केली आहे.

केंद्र सरकारच्या सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या महासंचालक संगीता गोडबोले, केंद्रीय विधी खात्याचे सहसचिव असलेले पोलिस अधिकारी सदानंद दाते, फिजीमधील भारताचे माजी उच्चायुक्त विश्वास सपकाळ, व्हॉईस ऍडमिरल मुरलीधर पवार या प्रमुख पाहुण्यांनी गुणवंतांचे कौतुक करताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू तरुणांनाही मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षा का द्यायची आहे? हे सर्वात अगोदर ठरविणे गरजेचे आहे. यश शक्य आहे. त्यामुळे स्पर्धेचा ताण घेऊ नका. श्रीकृष्ण, शिवाजी महाराजांचे उदाहरण समोर ठेवा, असा सल्ला व्हाईस ऍडमिरल पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. विश्वास सपकाळ यांनी परराष्ट्र सेवेतील अनुभवांचे कथन करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संवाद साधा, सोपा, सरळ ठेवण्याची सूचना केली.

सदानंद दाते यांनी प्रशासकीय सेवेचे बदलते स्वरुप, राजकीय नेतृत्वाचे प्रभावी होणे याकडे भावी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना जगभरात होणाऱ्या या बदलाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करण्यास सांगितले. यावेळी पोलिस सेवेतील काही उदाहरणेही त्यांनी उपस्थितांना सांगितली. तसेच संगीता गोडबोले यांनी मराठी माणसाची एक सामाजिक बांधिलकी आहे आणि या बांधिलकीची प्रशासकीय सेवेला नितांत गरज आहे, अशा शब्दात आपले मत व्यक्त केले.

परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी आणि मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे हे 'पुढचे पाऊल' संस्थेचे संस्थापक असून प्रशासकीय अधिकारी आनंद पाटील, उन्मेष वाघ, प्रफुल्ल पाठक, विलास बुरुडे, सुशील गायकवाड, सतीश जाधव, सुप्रिया देवस्थळी, रेखा रायकर, डाॅ. ज्ञानेश्वर वीर यांच्यासह 175 हून अधिक अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पूर ग्रस्तांच्या मदतीसाठी 'पुढचे पाऊल' संस्थेतर्फे 20 सप्टेंबरला दिल्लीत संगीत कार्यक्रम घेण्याचीही यावेळी घोषणा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com