सरन्यायाधीश दीपक मिश्रांनी पदाचा गैरवापर केला : काँग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

''भारताच्या राज्यघटनेनुसार अशाप्रकारचा प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांची गरज असते. मात्र, आम्ही 71 खासदारांची स्वाक्षऱ्या असलेले पत्र राज्यसभा अध्यक्षांना दिले आहे''.

- गुलाम नबी आझाद, विरोधी पक्षनेते, राज्यसभा

नवी दिल्ली :  ''सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबतची नोटीस राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष या प्रस्तावावर विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे'', असे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाची नोटीस आणण्यासाठी वेंकय्या नायडू यांची काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल उपस्थित होते. 

kapil sibal

आझाद म्हणाले, भारताच्या राज्यघटनेनुसार अशाप्रकारचा प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांची गरज असते. मात्र, आम्ही 71 खासदारांची स्वाक्षऱ्या असलेले पत्र राज्यसभा अध्यक्षांना दिले आहे. या प्रस्तावाबाबत आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. आम्ही फक्त राज्यसभा अध्यक्षांकडे हा प्रस्ताव दिला आहे. त्याची पूर्तता केली आहे. आता आम्हाला विश्वास आहे, या प्रस्तावावर राज्यसभा अध्यक्ष कार्यवाही करतील. 

कपिल सिब्बल म्हणाले, आज दुपारी राज्यसभा अध्यक्षांची आम्ही भेट घेतली. याबाबतचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला. ज्या व्यक्तीकडून पदाचा गैरवापर करण्यात येतो, अशा व्यक्तींना पदावरून दूर करता येऊ शकते, असे संविधानानुसार साध्य होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धत घटनेनुसार चालत नसल्याचे सांगण्यात आले होते. यातील काही बाबी घटनेला धरून नव्हत्या. त्यामुळे राज्यसभा अध्यक्षांनी आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा स्वीकार करावा.

Web Title: CJI Deepak Mishra Has misuse their Rights says Congress