esakal | पोलिसांत आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांत आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

भाजप नेत्यावरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी 24 परगना जिल्हा बंद पाळण्यात आला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, रेल्वेसेवा बंद पाडली. पोलिस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात काही भागांत धुमश्‍चक्री आणि बाचाबाचीचे प्रकार घडले.

पोलिसांत आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता : भाजप नेत्यावरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी 24 परगना जिल्हा बंद पाळण्यात आला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, रेल्वेसेवा बंद पाडली. पोलिस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात काही भागांत धुमश्‍चक्री आणि बाचाबाचीचे प्रकार घडले.

यादरम्यान राज्यपाल जगदीप धनखड यांनी बैरकपूर येथून भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांची विचारपूस केली. काल एका आंदोलनादरम्यान सिंह जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजपने खासदार अर्जुन सिंह आणि नेत्यावरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ 12 तासांचा बंद पुकारला होता. सिंह यांच्या मते, बैरकपूर पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी त्यांना धक्का मारला आणि त्यामुळे त्यांच्या डोक्‍याला मार लागला. तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयावर ताबा घेतल्याने त्याच्या निषेधार्थ काकिनारा येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप खासदार सिंह यांनी केला.

यादरम्यान राज्यपालांनी म्हटले की, जेव्हा मी हिंसा पाहतो तेव्हा दु:खी होतो. शिक्षक, डॉक्‍टर, वकील आणि पत्रकारांसमवेत असे काही घडते तेव्हा मला त्रास होतो. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, आज बंदच्या काळात दुकाने, व्यापारी संकुल बंद राहिले. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. लाकुथी आणि बैरकपूर-बारासात मार्गावर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसात धुमश्‍चक्री उडाली. या वेळी आंदोलकांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात भाजप कार्यकर्ते आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले.

loading image
go to top