हरयानात विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची शाळेत गोळ्या झाडून हत्या

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

. हल्लेखोर विद्‌यार्थ्याने अवघ्या 10 फुटांवरुन छाबरा यांच्यावर गोळ्या झाडल्या. यांमधील दोन गोळ्या त्यांच्या हातांमध्ये; तर एक गोळी थेट छातीत घुसली. चौथी गोळी त्यांच्या मस्तकास स्पर्श करुन गेली. ही हत्या करण्यासाठी या विद्यार्थ्याने त्याच्या पित्याचे रिव्हॉल्व्हर वापरले

चंडीगड - हरयानामधील यमुनानगर येथील स्वामी विवेकानंद शाळेमधील 47 वर्षीय मुख्याध्यापिका रितु छाबरा यांची बारावीत शिकणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने चार गोळ्या झाडून क्रूर हत्या केल्याचे वृत्त आज (रविवार) सूत्रांनी दिले.

वर्गामधील इतर विद्यार्थ्यांबरोबर सतत भांडण करत असल्याबद्दल; तसेच शैक्षणिक कामगिरी खराब होत असल्याबद्दल या विद्यार्थ्याची छाबरा यांनी कानउघाडणी केली होती. याचा राग आल्याने या विद्यार्थ्याने छाबरा यांच्या दालनात घुसून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने शाळेमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेमधील शिक्षक व पालकांनी त्याला पकडून ठेवले. शाळेमध्ये यावेळी पालक सभा सुरु होती.

छाबरा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अति रक्‍तस्त्राव झाल्याने तीन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. हल्लेखोर विद्‌यार्थ्याने अवघ्या 10 फुटांवरुन छाबरा यांच्यावर गोळ्या झाडल्या. यांमधील दोन गोळ्या त्यांच्या हातांमध्ये; तर एक गोळी थेट छातीत घुसली. चौथी गोळी त्यांच्या मस्तकास स्पर्श करुन गेली. ही हत्या करण्यासाठी या विद्यार्थ्याने त्याच्या पित्याचे रिव्हॉल्व्हर वापरले.

या हल्लेखोराचे वडिल शहरातील प्रसिद्ध सावकार आहेत. मुलगा व पिता या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Class XII boy shoots Haryana principal

टॅग्स