
Gajanan Kirtikar: किर्तीकरांनी भाजपवर केलेल्या आरोपांवर CM एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, नक्कीच...
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच भाजपबाबत नाराजी व्यक्त करताना एनडीएत घटक पक्षांना सापत्न वागणूक मिळत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. किर्तीकरांना नेमकं काय म्हणायचं होतं हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केला. (CM Eknath Shinde explanation on Gajanan Kirtikar allegations against BJP)
CM शिंदे म्हणाले, तुम्ही गजानन किर्तीकरांच्या विधानाचा विपर्यास करत आहात. यापूर्वी आम्ही एनडीएत नव्हतो आता आम्ही एनडीएत आहोत. आता एनडीए आणि आम्ही एकत्र आहोत तर नक्कीच आता आमची सर्व कामं झाली पाहिजेत. आत्ताच आम्ही एनडीएचे घटक पक्ष झालो आहोत त्यानंतर जे प्रस्ताव राज्याचे केंद्राकडं जातात. त्या एकाही प्रस्तावात काटछाट होत नाही, ते जसेच्या तसे मान्य होत आहेत. हे काय आमचं वैयक्तिक किंवा किर्तीकरांचं वैयक्तिक काम नाही. केंद्र सरकार सढळ हस्ते आम्हाला मदत करत आहे. बजेटमध्ये केंद्रानं राज्याला बरेच पैसे दिलेत.
किर्तीकर काय म्हणाले होते?
ठाकरे गटातून नंतर शिंदे गटात सामिल झालेल्या खासदार गजानन किर्तीकर यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले होते की, "आम्ही आता एनडीएचे घटक आहोत, आधी आम्ही घटकपक्ष नव्हतो. पण आता आहोत तर त्यापद्धतीनं आमची काम झाली पाहिजेत. घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे असा आमचा मुद्दा आहे. घटक पक्षाला तसा दर्जा भाजप देत नाही. घटकपक्षांना ते सापत्न वागणूक देत असल्याचं आमचं म्हणणं आहे"
किर्तीकरांचं विधान कपोकल्पित - फडणवीस
किर्तीकरांच्या भाजपवरील आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलो होती. "ते असं म्हटलेच नाहीत, या सर्व कपोकल्पित बातम्या असल्याचं फडणवीस म्हणाले होते. आमच्यामध्ये काहीही अडचण नाही. आम्ही खूपच समन्वय साधत काम करत आहोत. शिवसेना-भाजपत सर्वकाही निश्चित होईल तेव्हा तुम्हाला आम्ही सांगूच"