आता महाराष्ट्र सदनाच्या कॉफीत झुरळ!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

जमीर यांनी तर सदनातील निकृष्ट खाद्यपदार्थांबाबत पत्रकारांना बोलावूनच माहिती दिली होती. आज याचा फटका मुख्य न्यायाधीशांना बसला.

नवी दिल्ली : राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनातील उपाहारगृहाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका दस्तूरखुद्द मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना बसल्याची माहिती "सकाळ'ला मिळाली असून, आज सकाळी त्यांना देण्यात आलेल्या कॉफीत चक्क झुरळ निघाल्याचे समजते. यानंतर सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्‍ला यांनी रात्री मुख्य न्यायाधीश मृदुला छेल्लूर यांची भेट घेऊन संबंधित प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे. या उपाहारगृहाच्या नागपूर येथील कंत्राटदारांना उद्या (ता. 21) तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे.

राज्याच्या मुख्य न्यायाधीश छेल्लूर या एका परिषदेसाठी दिल्लीत आल्या होत्या. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छेल्लूर यांनी आज सकाळी सदनाच्या उपाहारगृहातून कॉफी मागविली. जेव्हा कॉफी आली तेव्हा त्या थर्मासवर एक झुरळ फिरताना त्यांना आढळले. जेव्हा कॉफी कपात ओतण्यात आली तेव्हा त्यात चक्क मेलेले झुरळ आढळले. स्वतः न्या. छेल्लूर यांनी हा प्रकार विलक्षण समजुतीने घेतल्याचे दिसून आले. त्यांना स्वतःला दुसऱ्यांदा सदनाच्या उपाहारगृहाच्या अव्यवस्थेचा फटका बसला असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी त्या दिल्लीत आल्या असतना त्यांनी जेवणावेळी जिऱ्याची पूड मागवली तेव्हा त्यांना, आम्ही असे काही इथे ठेवत नाही,' असे उद्दामपणे सांगितले गेल्याची माहिती समजली आहे.

दुसरीकडे सदनाच्या आयुक्त शुक्‍ला यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला याची कल्पनाच नाही, असे सुरवातीला सांगितले. नंतर त्या म्हणाल्या, की आपण मुख्य न्यायाधीशांची भेट घेणार आहोत व नंतर संबंधितांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

नव्या-जुन्या महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील भोंगळपणाचे फटके यापूर्वी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी राज्यपाल एस. सी. जमीर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसलेले आहेत. जमीर यांनी तर सदनातील निकृष्ट खाद्यपदार्थांबाबत पत्रकारांना बोलावूनच माहिती दिली होती. आज याचा फटका मुख्य न्यायाधीशांना बसला. या सदनाच्या उपाहारगृहातील व्यवस्था नव्या कंत्राटदारांकडे आल्यापासून येथे महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ भरमसाट दरात दिले जातात व त्यांच्या स्वच्छतेबाबत किमान काळजीही घेतली जात नाही, हे दिल्लीकरांनी कित्येकदा अनुभवले आहे. आज त्याची पुनरावृत्ती झाली.

संबंधितांवर कारवाई करणार
महाराष्ट्र सदनातील या उपाहारगृहाचे कंत्राट ज्याच्याकडे आहे ते नागपूरच्या "किझीन केटसर्स अँड हॉस्पिटॅलिटी'चे व्यवस्थापकीय संचालक दर्शन पांडे यांनी हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे "सकाळ'ला सांगितले. पांडे म्हणाले, की सदनाच्या प्रशासनानेच आम्हाला हे थर्मास दिले होते व वापरण्यापूर्वी आज सकाळी दोनदा ते गरम पाण्याने धुवूनही घेतलेले होते. तरीही त्याच्या झाकणाच्या फटीत झुरळ राहिले होते. मात्र झाले हे काही बरोबर झालेले नाही व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

Web Title: cockroach in coffee of maharashtra sadan