उत्तर भारतात थंडीची लाट

पीटीआय
सोमवार, 7 जानेवारी 2019

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे. हिमवृष्टीमुळे तिन्ही राज्यांतील अनेक भागांत बर्फाची चादर पसरली आहे. दरम्यान, दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची नोंद झाली, त्यामुळे दिल्लीकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळाला. 

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे. हिमवृष्टीमुळे तिन्ही राज्यांतील अनेक भागांत बर्फाची चादर पसरली आहे. दरम्यान, दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची नोंद झाली, त्यामुळे दिल्लीकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळाला. 

जम्मू काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये दोन दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. काश्‍मीर खोरे गारठले असून जनजीवन ठप्प पडले आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. परिणामी शनिवारपासून श्रीनगर विमानतळावरून एकाही विमानाने उड्डाण केले नाही. शुक्रवारी सायंकाळी उतरलेले विमान हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहत आहेत. जम्मू- श्रीनगर महामार्गदेखील बंद केला आहे. रस्त्यावरचा साचलेला बर्फ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र सतत वातावरणात बदल होत असल्याने कामात अडथळे येत आहेत. काश्‍मीरप्रमाणेच उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही बर्फवृष्टी होत आहे.

उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी उणे दहा अंशांवर तापमान घसरले आहे. केदारनाथ येथे एक फूटहून अधिक हिमवृष्टी झाली आहे. कडाक्‍याच्या थंडीने सतत पडणाऱ्या बर्फामुळे मंदाकिनी नदीचे पाणी गोठत आहे. हिमाचल प्रदेशमध्येदेखील हिमवृष्टी सुरूच आहे. हवामान खात्याने सोमवारपर्यंत काही भागात हिमवृष्टी सुरूच राहील, असे म्हटले आहे. दिल्लीत रविवारी पहाटे पाचच्या सुमारास काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सकाळी धुकेही पसरले होते. 

कारगिल, लडाख गारठले 

रविवारी श्रीनगरचे किमान तापमान शून्य ते उणे 1.2 अंश सेल्सिअसवर पोचले. पहलगाम येथे शून्य ते उणे 7.9, गुलमर्ग येथे शून्य ते उणे 9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. लेह शहराचे तापमान उणे 10.3, तर कारगिलचे तापमान सर्वात नीचांकी उणे 18.6 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

काल रात्री कारगिल खोरे सर्वाधिक गारठले होते. जम्मू शहराचे तापमानही 7.4 अंश सेल्सिअस, तर कटरा 9.2 अंश सेल्सिअस आणि बटोटचे उणे 0.8 अंश सेल्सिअस, बहिनालचे उणे 0.5 अंश सेल्सिअस आणि भरदवाह येथे 1.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. रियासी जिल्ह्यातील वाढत्या हिमवृष्टीमुळे वैष्णोदेवी मंदिरासाठी हेलिकॉप्टर आणि केबल कार सेवा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. 

Web Title: Cold wave in northern India