ओडिशात हुडहुडी; अवकाळी पावसामुळे घसरला पारा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ओडिशात पारा घसरला असून, शनिवारी रात्री ओडिशाचे तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. ओडिशामध्ये गेल्या पाच वर्षांतील फेब्रुवारीतील सर्वांत थंड दिवस ठरला असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली.

भुवनेश्वर - अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ओडिशात पारा घसरला असून, शनिवारी रात्री ओडिशाचे तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. ओडिशामध्ये गेल्या पाच वर्षांतील फेब्रुवारीतील सर्वांत थंड दिवस ठरला असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पावसामुळे रविवारी राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच, शनिवारच्या वातावरणबदलाने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्याच्या राजधानीतील खंडागिरी आणि उदयगिरी यासारख्या पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शनिवारी राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये पारा घसरल्याने २०१५ नंतर प्रथमच दिवसाचे कमीत कमी तापमान नोंदविले गेल्याचे हवामान विभागाने काढलेल्या पत्रकात सांगितले. शनिवारी बालासोर येथील कमाल तापमान १७.२ अंश सेल्सिअस होते; जे की या महिन्यातील आत्तापर्यंतच्या तापमानापेक्षा ७.८ अंश सेल्सिअसने कमी होते, असेही हवामान विभागाने नमूद केले. तसेच, हवामान विभागाने मयूरभंज, केंझार, भद्रक, ढेंकनाल, जाजपूर, केंद्रापारा, जगतसिंगपूर, कटक, खुर्दा, पुरी, गंजम, कंधमाल आणि नयागढ जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला. तर सोमवारी अंगुल, सुंदरगड, बालागीर, बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यात थंडी वाढण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान
शहर    कमाल    किमान
भुवनेश्वर    २०.६    ५.१
कटक    १९.६    ५.८
बालासोर    १७.२    ७.८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold weather In Odisha