Kargil Vijay Diwas : स्वत: जखमी होते; तरीही 48 पाकिस्तान्यांना ठार केले! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

युद्ध गाजविलेल्या प्रत्येक वीराची कहाणी भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. यांपैकीच एक 'हिरो' म्हणजे दिगेंद्रसिंह! 

नवी दिल्ली : स्वत:च्या देशाच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावत भारतीय जवानांनी कारगिलचे युद्ध जिंकले, त्या घटनेला आज 20 वर्षे पूर्ण झाली. या युद्धात भारताचे जवळपास पाचशे जवान आणि अधिकारी हुतात्मा झाले. युद्ध गाजविलेल्या प्रत्येक वीराची कहाणी भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. यांपैकीच एक 'हिरो' म्हणजे दिगेंद्रसिंह! 

राजस्थानमधील सीकरमध्ये राहणारे दिगेंद्रसिंह आता निवृत्त झाले आहेत. भारतीय लष्कराच्या सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या कोब्रा कमांडोंपैकी ते एक होते. कारगिल युद्धामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैन्याला रोखण्यात आणि मागे ढकलण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. दिगेंद्रसिंह यांना युद्धामध्ये पाच गोळ्या लागल्या होत्या. जखमी अवस्थेतही त्यांनी पाकिस्तानच्या 48 सैनिकांना ठार केले होते. एका क्षणी तर दिगेंद्र यांच्याकडील गोळ्या संपल्या आणि त्यांनी चाकूने पाकिस्तानच्या एका मेजरचा शिरच्छेद केला होता. 

कारगिल युद्ध संपल्यानंतर दिगेंद्र यांना तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'महावीरचक्र' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 47 वर्षीय दिगेंद्र 2005 मध्ये लष्करातून निवृत्त झाले. 

आजही देशासाठी झुंजण्याची दिगेंद्र यांची तयारी आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही दिगेंद्र यांनी पुन्हा लष्करात दाखल होत दहशतवाद्यांशी लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी दिगेंद्र म्हणाले होते, की ज्या दिवशी युद्धाची घोषणा होईल मी बाकी सर्व सोडून माझ्या राजपुताना बटालियनमध्ये पुन्हा दाखल होईन. प्रत्यक्ष रणांगणावर संधी मिळू शकली नाही, तरीही भारतीय जवानांना साथ तरी नक्कीच देऊ शकतो, असे ते म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commando Digendrasingh killed 48 pakistanis when he was injured at Kargil War