व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commercial cylinder price low by 115

व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : चौफेर भडकलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला केंद्र सरकारने हॉटेल आणि ढाबा व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या १९.२ किलोग्रॅम सिलिंडरची किंमत आज आणखी ११५.५० रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

मात्र, घरगुती सिलिंडरचा दर ‘ जैसे थे’ ठेवल्याने आम आदमीसह गृहिणींना दिलासा मिळू शकलेला नाही. अर्थात घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात जुलैपासून वाढदेखील झालेली नाही. हॉटेल, ढाबे व खाद्यपदार्थांच्या दुकानात व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि घराबाहेर नाष्टा किंवा जेवण करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल.

सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. देशातील गॅस कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी १४ किलोच्या घरगुती आणि १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. १ ऑक्टोबरलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत २५.५ रुपयांनी कपात करण्यात आली होती.

पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार

मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी सध्या १ हजार ८४४ रुपये मोजावे लागतात. आता दरकपातीनंतर १ हजार ६९६ रुपये द्यावे लागतील. १९ किलोच्या इंडेन एलपीजी सिलिंडरची किंमत १८५९ वरून आता १७४४ रुपये झाली आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांची कपात होऊ शकते असेही संकेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिले.