गरिबांना परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी कटिबद्ध- मोदी

टीम ई सकाळ
सोमवार, 17 एप्रिल 2017

'डिझाइन इन इंडिया'
हिरे वगैरे सराफी व्यवसायाबद्दल बोलायचे तर त्यामध्ये फक्त 'मेक इन इंडिया' एवढेच उद्दिष्ट असू नये. 'डिझाइन इन इंडिया'देखील त्यामध्ये असावे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 

सूरत : गरिबांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. अनेक सक्षम लोक माझ्यावर नाखूश आहेत. परंतु, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

गुजरात, दादरा आणि नगर हवेलीच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज (सोमवार) रवाना झाले असून, या दरम्यान ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज सकाळी त्यांनी किरण हॉस्पिटलचे उद्घाटन केले. ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे ते वेळेत पूर्ण झाले तरच त्याचे लाभ लोकांपर्यंत पोचतील, असे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "मी कार्यभार स्वीकारल्यावर औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या नाराज झाल्या तरी औषधांच्या किमती कमी करण्यासाठी यंत्रणा सुरू केली. परवडणारी आरोग्यसेवा भारतात प्रत्यक्षात यावी यासाठी स्टेंटच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आपल्या देशात आरोग्य धोरण आले. आपण पूर्वदक्षता घेणाऱ्या आरोग्यसेवांवर भर द्यायला हवा. स्वच्छ भारत अभियान हादेखील सुदृढ भारताच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचा भाग आहे."

 

Web Title: committed to affordable healthcare, says narendra modi