शेतकऱ्यांना भरपाई द्या - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी या भेटीत केल्याचे पवार यांनी सांगितले.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्ता पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात खळबळ उडवून गेली. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी या भेटीत केल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी काहीही राजकीय बोलणी झाली नसल्याचा दावाही पवार यांनी केला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली कथित सहमती तसेच दोन्ही पक्षांच्या निर्णायक बैठकीआधीच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे यावरून तर्कवितर्कांना उधाण आले होते. संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयात शरद पवार जाऊन भेटले. 

अर्ध्या तासाहून अधिक काळ दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. याच दरम्यान गृहमंत्री अमित शहा हेदेखील पंतप्रधान कार्यालयात काही क्षण गेल्यामुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये अटकळबाजी सुरू झाली होती. परंतु, शहा अवघ्या काही मिनिटांतच बाहेर आल्याने त्याला पूर्णविराम मिळाला.

पवार यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक तसेच विदर्भाचा दौरा करून हानीचा आढावा घेतला होता. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधताना विनाशर्त संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे ३१ जानेवारी २०२० ते दोन फेब्रुवारी २०२० या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रण मोदींना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compensate the farmers Says Sharad pawar