"सायकल'साठी पिता-पुत्रांची लढाई

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017


सायकल हे चिन्ह आमचेच आहे. गैरप्रकार केल्याचा आरोप माझ्यावर कोणीही करू शकत नाही. मी कोणालाही धोका दिलेला नाही अथवा भ्रष्टाचारात गुंतलेलो नाही.
- मुलायमसिंह यादव, "सपा'चे सर्वोच्च नेते

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबामध्ये सुरू असलेला वाद आज दिल्लीत पोचला. समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज दिल्लीमध्ये निवडणूक आयोगात जाऊन "सायकल' या निवडणूक चिन्हावर आपलाच हक्क असल्याचे सांगितले. त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षाच्या राष्ट्रीय सभेत अध्यक्षपद दिल्यावरून पक्षामध्ये फूट पडली आहे.

मुलायमसिंह यादव यांनी आज दिल्लीमध्ये दाखल होत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्याबरोबर अमरसिंह, शिवपाल यादव, जया प्रदा हे नेते होते. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असल्याने मुलायमसिंह यांनी सायकल या चिन्हावर आपला दावा सांगितला. पक्षाचे नेते शिवपाल यादव हेही आज दिवसभर मुलायम हेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे वारंवार सांगत होते. दरम्यान, मुलायम यांनी पाच जानेवारीला होणारी पक्षाची बैठक रद्द केली आहे. ही बैठक रद्द करण्यामागील कारण शिवपाल यादव यांनी सांगितले नसले तरी, अखिलेश यांनी बोलाविलेल्या पक्षाच्या अधिवेशनाला झालेली आमदार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहूनच हा निर्णय झाल्याचे समजते.

अखिलेश यांनी काल पक्षाध्यक्षपद स्वत:कडे घेत पक्षावर ताबा मिळविल्याचे बोलले जाते. मुलायम यांनी सर्व प्रक्रियाच चुकीची आणि अमान्य असल्याचे म्हटले आहे. तरीही अखिलेश यांनी आज लखनौमधील आपल्या निवासस्थानी अनेक आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांना भेटीसाठी बोलाविले होते. उद्या (ता. 3) तेदेखील दिल्लीत निवडणूक आयोगात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेत सायकल या चिन्हासाठी दावा करण्याची शक्‍यता आहे. पिता-पुत्रामधील वाद विकोपाला गेला असला तरी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दोघांनीही आपापल्या समर्थकांना वादाकडे लक्ष न देता निवडणुकीच्या तयारीवर अधिक लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मुलायमसिंह यांच्याविरोधात काहीही न बोलण्याची सक्त ताकीदही अखिलेश यांनी आपल्या समर्थकांना दिली आहे.

कायमच नेताजींच्या बाजूने आहे. मी एकेकाळी पक्षाचा हीरो होतो; पण आता त्यांच्यासाठी खलनायक होण्याचीही माझी तयारी आहे.
- अमरसिंह, सपा नेते

Web Title: conflict in mulayam and son!