यादवी कायम, समेट नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

पक्ष चिन्हांबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोग घेईल. दरम्यान, पक्षाच्या सायकल या चिन्हावर अखिलेश आणि मुलायम या दोहोंच्या गटाने आपला हक्क सांगितला असून निवडणूक आयोग हे चिन्ह एक तर गोठवू शकते किंवा दोन्ही गटांना वेगळे चिन्ह देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अखिलेश यांना पक्षातील नव्वद टक्के आमदारांचा पाठिंबा असून, त्यामुळे तेच पक्षाचे नेतृत्व करतील असे रामगोपाल यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे

लखनौ - समाजवादी पक्षातील यादव पितापुत्र संघर्ष लवकर संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. स्वत:चा सवता सुभा थाटणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंह यांच्याशी तडजोड करण्यास नकार दिला आहे. आज अखिलेश आणि मुलायम यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली. या बैठकीस रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल आझमखान यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना रामगोपाल यादव म्हणाले की, अखिलेश हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार आहोत. पक्ष चिन्हांबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोग घेईल. दरम्यान, पक्षाच्या सायकल या चिन्हावर अखिलेश आणि मुलायम या दोहोंच्या गटाने आपला हक्क सांगितला असून निवडणूक आयोग हे चिन्ह एक तर गोठवू शकते किंवा दोन्ही गटांना वेगळे चिन्ह देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अखिलेश यांना पक्षातील नव्वद टक्के आमदारांचा पाठिंबा असून, त्यामुळे तेच पक्षाचे नेतृत्व करतील असे रामगोपाल यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी समाजवादी पक्षात चिन्हावरून निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येण्याची शक्‍यता कमीच आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागू शकतो.

समाजवादी पक्षातील संघर्ष चिंताजनक असून अद्याप वेळ गेलेली नाही. या प्रश्‍नावरही तोडगा काढता येऊ शकतो.
- आझमखान, समाजवादी पक्षाचे नेते

यादव-कुर्मी समीकरण
उत्तर प्रदेशातील सत्ता सिंहासन अधिक मजबूत करण्यासाठी अखिलेश यादव यांनी आता यादव आणि कुर्मी असे नवे समीकरण तयार केले आहे. यामुळे उत्तरेतील लढाई जिंकणे अखिलेश यांना सहज सोपे होईल. हे गणित डोक्‍यामध्ये ठेवूनच अखिलेश यांनी काका शिवपाल यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविल्याचे समजते. नवे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम हे माजी मंत्री असून कुर्मी समाजातील प्रबळ नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी शेवटपर्यंत धर्मेंद्र यादव यांचे नाव चर्चेत होते पण अखेरच्या क्षणी नरेश उत्तम यांची निवड करण्यात आली. नरेश उत्तम हे ओबीसी नेते आहेत.

आझमखान यांचा प्रस्ताव
मुलायम आणि अखिलेश यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते आझमखान यांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळीच आझमखान सामंजस्याचा प्रस्ताव घेऊन दिल्लीत आले होते, पण मुलायम यांनी तातडीने लखनौ गाठले. येथे अखिलेश आणि मुलायम यांच्यात चर्चा झाली. अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही वाद मिटविण्याचा प्रयत्न करू, असे आझमखान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Conflict persists in SP