भाजपकडून आमच्या आमदारांची शिकार; काँग्रेसचा आरोप 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

काँग्रेसने आपले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी त्यांना काही दिवस एका रिसॉर्टवर ठेवण्याचे नियोजन केले आहे.

बंगळूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'भाजप आमच्या आमदारांना जाळ्यात ओढून, त्यांची शिकार करू पाहत आहेत', असा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना या विरूद्ध लढण्याचे, हे प्रकार रोखण्याचे व या विरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्नाटकच्या राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला प्रथम सत्ता स्थापनेची संधी दिल्यास कोर्टात जाण्याचे आदेशही गांधी यांनी दिले.   

rahul gandhi

काँग्रेसने आपले आमदार भाजपच्या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी त्यांना काही दिवस एका रिसॉर्टवर ठेवण्याचे नियोजन केले आहे. काँग्रेसचे नेते मधु गौड यक्षी यांनीही भाजप आपल्या आमदारांना फोडून मंत्रीपदाची ऑफर देत असल्याचा आरोप भाजपवर केला. त्यासाठी ते आयटी विभागाची मदत घेत असल्याचे यक्षी यांनी सांगितले. 

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला 104 जागा मिळाल्या, सत्तास्थापनेसाठी त्यांना 112 जागा मिळवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आता इतर आमदारांना आपल्या बाजूने करण्याचे भाजपचे प्रयत्न चालू झाले आहेत. तर काँग्रेसला 78 व जेडीएसला 38 जागा मिळाल्या आहेत. आता काँग्रेस व जेडीएसने एकत्र येत सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कोणाला प्रथम संधी देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.  

Web Title: Congress accuses BJP of poaching its MLAs