गोव्यात काँग्रेस बॅकफूटवर

अवित बगळे 
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पणजी : राष्ट्रपती राजवट लावा, सरकार बरखास्त करा अशा जोरजोराच्या मागण्या केलेल्या काँग्रेस पक्षाने काल राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यातील ढासळलेल्या प्रशासनाकडे त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री अमेरीकेहून परतल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेत झालेला हा बदल आज ठळकपणे जाणवला. दुसरीकडे गुरूवारी (ता.6) सायंकाळी अमेरीकेतून गोव्यात आलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी विश्रांती घेणे पसंत केले.

पणजी : राष्ट्रपती राजवट लावा, सरकार बरखास्त करा अशा जोरजोराच्या मागण्या केलेल्या काँग्रेस पक्षाने काल राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यातील ढासळलेल्या प्रशासनाकडे त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री अमेरीकेहून परतल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेत झालेला हा बदल आज ठळकपणे जाणवला. दुसरीकडे गुरूवारी (ता.6) सायंकाळी अमेरीकेतून गोव्यात आलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल आपल्या खासगी निवासस्थानी विश्रांती घेणे पसंत केले.

काँग्रेसने आपण विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून याआधी 16 एप्रिल व 9 मे रोजी राज्यपालांना निवेदन देऊन सत्ता स्थापनेची संधी देण्याची मागणी केली होती. आता त्याच स्वरुपाची निवेदन काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आले. राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, विद्यमान सरकार बरखास्त करा या मागणीपासून काँग्रेस बॅकफूटवर का आली याची राजकीय चर्चा काल रंगली होती. काँग्रेसचे 16 पैकी केवळ 9 आमदार राजभवनावर पोचण्यात याचे उत्तर दडले असावे असाही या मुद्दा या चर्चेत होता. मुख्यमंत्री अमेरीकेतून परत आल्यामुळे राजकीय फेरजुळणी होणार असेल तर त्यांच्या पुढाकाराने ती आता होऊ शकते. गणेश चतुर्थीनंतर त्याची शक्यताही सध्या चर्चेत आहे.

राज्यपालांना भेटण्यासाठी गेलेल्यांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, प्रवक्ते अॅड रमाकांत खलप, अॅड यतीश नाईक, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, कॉंग्रेसचे राज्य प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार, आमदार इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, नीळकंठ हळर्णकर, रवी नाईक, दिगंबर कामत, जेनिफर मोन्सेरात, क्लाफासियो डायस आणि विल्फ्रेड डिसा यांचा समावेश होता. राज्यपालांना भेटून परत आल्यावर चेल्लाकुमार यांनी भाजपचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, जे काम मंत्र्याने करायचे असते ते काम सभापतींनी केले. तत्वाच्या गोष्टी करणारा भाजप सभापतींचा राजीनामा कधी घेणार ते त्यांनी सांगावे. यावेळी कवळेकर या्ंनी विकासकाने ठप्प झाल्याने गोव्याची पिछेहाट सुरु झाल्याची टीका केली.

दरम्यान, भाजपच्या गोटात काल शांतता होती. परवा मंडळ अध्यक्षांची बैठक घेतल्यानंतर भाजपने आता मतदानकेंद्र संपर्क मोहिमेची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात बदल करतील आणि कोणाला संघी देतील याची तरी चर्चा सुरु असे. आज तिही चर्चा ऐकू आली नाही. मुख्यमंत्री राजकीय पातळीवर कोणती चाल खेळतील याकडे जणू सर्वांचे लक्ष लागले असावे एवढी शांतता पक्षीय पातळीवर आज जाणवली.

मुख्यमंत्री सोमवारी कार्यालयात

मुख्यमंत्री येत्या सोमवारपासून मंत्रालयात नियमितपणे कामकाज पाहणार आहेत. परवा अमेरीकेतून परतल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आठ दिवसांतील कामकाजाचे माहिती घेतली मात्र त्यांनी काल फाईल हाताळणे वा बैठका घेणे टाळले. त्यांनी घरीच विश्रांती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी व रविवारीही ते घरीच असतील. फोंडा तालुक्यातील एका विकासकामाची सुरवात मुख्ममंत्र्यांच्या हस्ते होणार होती. मात्र त्या कार्यक्रमासाठीही ते गेले नाहीत. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने होऊनच कामाकडे वळण्याचा त्यांचा इरादा असल्याचे दिसून येते. ते उपचारासाठी आजवर तिनवेळा अमेरिकेला जाऊन आले आहेत.

त्याचे त्यांनाच विचाराणा : कामत

काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्रीपदी दिगंबर कामत असतील अशी चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. त्याबाबत मडगावचे आमदार कामत यांना आज विचारले असता ते म्हणाले, याबाबत माझी भूमिका मी वारंवार स्पष्ट केली आहे. तरीही चर्चा सुरु राहते याला मी काय करू. अशी चर्चा करणाऱ्यांनाच आता तुम्ही याबाबत विचारा. माझ्याकडून तरी असे कोणतेही प्रयत्न या घडीला सुरु नाहीत एवढेच मी सांगू शकतो.

तंदुरुस्तीची चाचणी घ्या : चोडणकर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्याने आजारी रजा घेतली तर कामावर रुजू होण्यापूर्वी त्याला आपण तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आणावे लागते. कधी कधी वैद्यकीय मंडळासमोर त्याची चाचणीही घेतली जाते. मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरीकेला ये जा करत आहेत. त्यांच्या तंदुरुस्तीची चाचणी कोण घेणार. ते राज्याचा कारभार चालविण्यासाठी आरोग्यविषयक सक्षम आहेत याची चाचणी झाली पाहिजे.

अविश्वास ठराव मांडा : आप

आम आदमी पक्षाने विद्यमान सरकारवर अविश्वास ठराव मांडावा असा सल्ला काँग्रेसला दिला आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी पत्रकात म्हटले आहे, की यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसने केली पाहिजे. राज्यपालांना भेटीवेळी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित नव्हते यावरून ही भेट हा केवळ उपचार होता हेही सिद्ध होते. चेल्लाकुमार यांनी काही जण मासे माफीयांकडून हप्ता घेतात असा आरोप करतानाच काही सत्ताधारी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. गोमंतकीयांना याच्याशी देणेघेणे नसून ताटात येणारा मासा फॉर्मेलीनमुक्त आहे का याचीच लोकांना चिंता आहे.

Web Title: Congress back foot in Goa