काँग्रेसला धक्का; राजस्थान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राजीनामा देणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

- काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
- मध्यप्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. पण राहुल गांधीनी राजीनामा देऊनही काँग्रेसची सत्ता असलेल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री, महासचिव, प्रभारी आणि वरिष्ठ नेते पद सोडायला तयार नसल्याचे दिसून आले. त्यानंतर राहुल गांधी नाराज झालेले पाहायला मिळाले. या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही, अशा शब्दांत राहुल गांधीनी नाराजी व्यक्त केली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दलही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही राज्यात सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला. आता राहुल यांनी पुन्हा एकदा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्यानं गेहलोत आणि कमलनाथ यांच्यावरील दबाव वाढला आहे.

'राहुल गांधींचं विधान योग्य आहे. यासाठी कोण जबाबदार आहे, याची मला कल्पना नाही. मात्र मी आधीच राजीनामा देऊ केला होता. होय, मी पराभवासाठी जबाबदार आहे. पण दुसऱ्या नेत्यांबद्दल मला काहीही माहीत नाही,' असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री यांनीही राज्यातील पराभवासाठी स्वतःला जबाबदार धरले आहे. म्हणूनच गेहलोत आणि कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? या चर्चांना उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress CMs Kamal Nath and Ashok Gehlot on the back foot