मोदींनी भाषणबाजीशिवाय काही केले नाही - तिवारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दैनंदिन वार्तालापादरम्यान मोदींना लक्ष्य केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतरची 50 दिवसांची मुदत पूर्ण होऊन तीन दिवस झाले. त्यानंतर पंतप्रधानांची दोन भाषणे झाली. पण देशापुढील प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिलेली नाहीत. 50 दिवसांची मर्यादा संपूनही देशातील जनतेला होणारा त्रास संपलेला नाही.

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर 50 दिवस पूर्ण होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणबाजी करण्याव्यतिरिक्त या निर्णयामागील कारणांचा खुलासा केलेला नाही, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे, तसेच किती जुन्या नोटा जमा झाल्या, किती काळा पैसा उघडकीस आला आणि दहशतवाद्यांचा किती पैसा रोखला गेला, याचा तपशील सरकारने जाहीर करावा, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दैनंदिन वार्तालापादरम्यान मोदींना लक्ष्य केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतरची 50 दिवसांची मुदत पूर्ण होऊन तीन दिवस झाले. त्यानंतर पंतप्रधानांची दोन भाषणे झाली. पण देशापुढील प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिलेली नाहीत. 50 दिवसांची मर्यादा संपूनही देशातील जनतेला होणारा त्रास संपलेला नाही. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल. बनावट नोटा बाहेर येतील आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशाचा ओघ थांबेल, असे मोदींनी सांगितले होते. यातील नेमके काय झाले आणि किती प्रमाणात झाले, याचा खुलासा सरकारने करावा, असे आवाहन तिवारी यांनी केले.

सरकारने 500 व हजाराच्या 14 लाख 86 हजार कोटी रुपयांच्या नोटा रद्द केल्या. 30 डिसेंबरपर्यंत त्यातील किती पैसा बॅंकांमध्ये जमा झाला? आज तीन दिवस होऊनही त्यावर रिझर्व्ह बॅंक, सरकारकडून काहीही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. किती काळा पैसा उघडकीस आला, किती बनावट नोटा पकडल्या गेल्या आणि दहशतवाद्यांपर्यंत पोचणारी किती आर्थिक रसद रोखण्यात आली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी तिवारी यांनी केली.

Web Title: congress criticizes modi